अहमदनगर : आईच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी मुलीने देखील या जगाचा निरोप घेतला. आता आई आणि मुलीचा एकत्रित दशक्रिया विधी करण्याची दुःखद वेळ अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले  येथील शिंदे कुटुबियांवर आली आहे. सुकृता हिने पत्रकारीतेमध्ये पदविका प्राप्त केली होती. अकोले तालुक्यातील ही पहिली महिला पत्रकार आज जग सोडून निघून गेली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोले महाविद्यालयातील सेवा निवृत्त उपप्राचार्य, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनिल शिंदे  यांची ज्येष्ठ कन्या सुकृता हिचे आज पहाटे कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झाले. आई पाठोपाठ मुलीचीही कोरोना विरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. सुकृताची आई सुनिताताई शिंदे यांचेही आठ दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. माय-लेकीचा पाठोपाठ झालेल्या निधनामुळे अकोलेकर सुन्न  झाले आहेत. तिच्या निधनाची बातमी सर्वांना चटका लावून गेली.


पत्रकारीता क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अनेक जवळच्या लोकांचे कोरोनामुळे  निधन झाले. त्यातील एक म्हणजे सुकृता शिंदे. कोरोनाशी झुंज देत असतांनाच ती हे जग सोडून गेली.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संगमनेर महाविद्यालयात सुकृताने गेल्यावर्षी घवघवीत यश मिळविले होते. जागतिक महिला दिन असो की महिलांना कायदे विषयक जनजागृती पर लेखही तिचे प्रसिद्ध झाले होते. अकोले तालुक्याच्या इतिहासात  पहिली महिला पत्रकार म्हणून ती वाटचाल करु लागली होती. सुकृता हिने एम.ए मराठीचे देखील शिक्षण घेतले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने डी.एड अभ्यासक्रम ही पूर्ण केला होता. तिने डी.एडची पदविका संपादन केल्यानंतर तिला पत्रकारिता विषयाची विशेष आवड होती. त्यामुळे तिने पत्रकारिता अभ्यासक्रम ही पूर्ण केला. 


सुकृता हिचे लग्न जमले होते. मध्यंतरी साखर पुडा झाला होता, तिचा होणारा पती आणि त्यांचे कुटुंब तिची काळजी घेत होते. रात्री तिची प्रकृती खालावली. तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर देखील तिला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, पण तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.


4 मे 2021 या दिवशी तिचा विवाह  होणार होता. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विवाह पुढे ढकलण्यात आला होता.  पण हातावर मेहंदी लागण्याआधीच ती सर्वांना सोडून निघून गेली.