प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : माणुसकीला काळीमा फासणारी ही बातमी... मुलगी झाली म्हणून कोल्हापुरात एका जन्मदात्रीनंच आजीच्या मदतीनं नवजात मुलीला जमिनीत जिवंत गाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मुलीचं दैव बलवत्तर म्हणून शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळं मुलीचा जीव वाचवण्यात यश आलं.


आई - आजीचा खुनी डाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारिका मोरे असं या आईचं नाव आहे. आई या भावनेलाच नख लावायचं काम तिनं केलंय... कोल्हापूरच्या वळीवडे गावात राहणाऱ्या नकोशी भोसले हिची ही मुलगी... बाळंतपणासाठी ती माहेरी आली होती. तिनं एका मुलीला जन्म दिला. 'मुलगा' हवा असताना नेमका मुलीचा जन्म झाला. त्यात मुलीचे ओठ दुभंगलेले असल्यानं आई सारिका आणि आजी नकोशी भोसले यांनी तिला जमिनीत गाडून ठार मारायचं ठरवलं.


त्यानुसार दोघींनी मिळून घराच्या पाठीमागं खड्डा खोदला. पण हा प्रकार सुरू असताना नेमकं शेजाऱ्यांना पाहिलं... त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली आणि हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिलीय.


...म्हणून 'ती'नं उचललं हे पाऊल!


सारिका मोरे हिचा विवाह मिरज इथल्या लखन मोरे यांच्याशी झाला होता. लखन मोरे यांचा हा दुसरा विवाह असून त्याला पहिल्या पत्नीपासून चार मुली आहेत... आपल्यालासुद्धा मुलगी झाली तर पती स्वीकारणार नाही, या मानसिकतेतून तिनं हे पाऊल उचलल्याचं समोर येतंय.


त्या नवजात मुलीला सध्या उपचारासाठी कोल्हापुरातील सी.पी.आर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बालिकेची प्रकृती ठणठणीत आहे, अशी माहिती छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिलीय. 


मुलगा पाहिजे या हट्टापाई चिमुरडया मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न आई आणि आजीनं मिळुन केला. पण ज्या पतीच्या भीतीपोटी या जन्मदात्या आईनं हे पाऊल उचललं ती मानसिकता कधी बदलणार, हा खरा सवाल आहे.