सुनेकडून सासूला मिळणार पोटगी
सुनेलाही सासूला सांभाळावं लागणार
शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : हतबल सासू... आणि निर्ढावलेल्या सूना... समाजातली घर घर की कहानी काही नवी नाही... मात्र लातूरमधल्या एका घरात असं काही घडलं... की अख्ख्या समाजालाच नवा धडा देऊन गेलं... नेमकं असं काय घडलं हे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला सुद्धा लागली असणारच... त्यासाठी पाहा हा विशेष वृत्तांत.
लातूर तालुक्यातील बोरी इथल्या या ७५ वर्षीय मन्याबाई उर्फ मनकरणबाई भालके यांच्यावर ओढावलेल्या प्रसंगामुळे समाजाला धडा मिळाला आहे. मनकरणबाई भालके यांना 3 मुलं आणि 1 मुलगी. दुर्दैवानं त्यांची तिनही मुलं काही वर्षांच्या अंतराने वारली. त्यानंतर त्यांच्या तिन्ही सुनांनी त्यांना आपल्याकडे ठेवायला नकार दिला. त्यामुळे मन्याबाई यांची एकुलती एक मुलगी मुद्रिकाबाई मोरे यांनी त्यांना खोपेगावमधल्या आपल्या घरी आणलं. गेली अनेक वर्षं मन्याबाई आपल्या लेकीकडेच राहत आहेत.
सुना सांभाळत नसल्याचं मन्याबाईंच प्रकरण उपविभागीय दंडाधिका-यांकडे गेलं. यावर ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार तिनही सुनांनी महिन्याकाठी प्रत्येकी एक हजार रुपये, असे एकंदर तीन हजार रुपये पोटगी म्हणून सासू मन्याबाईंना देण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिका-यांनी दिले.
वृद्ध माता-पिता, सासू-सास-यांना दुय्यम वागणूक देण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिका-यांकडे अर्ज करून न्याय मागता येतो हे या घटनेतून स्पष्ट झालं. त्यामुळे अशी चूक करणा-या इतरांनी आताच सावध व्हायची गरज आहे.