पुणे : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी हाती येतेय. इथं आपल्या चिमुरड्याला वाचवण्यासाठी एक आई थेट बिबट्याशी भिडली. शेतात झोपलेल्या एका कुटुंबावर बिबट्यानं हल्ला केला. झोपलेल्या चिमुरड्याला आपल्या जबड्यात पकडत बिबट्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, या बिबट्याचा चिमुरड्याच्या आईनं प्राण पणाला लावून सामना केला. या आईच्या साहसाची चर्चा परिसरात केली जातेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुन्नर तालुक्यातील ढोलवाड गावात ही घटना घडलीय. सदर कुटुंबातील दाम्पत्य ऊस कामगार म्हणून काम करतात. गुरुवारी रात्री उशिरा उसाच्या शेतानजिक असलेल्या झोपड्यात पहुडलेले असताना बिबट्यानं १८ महिन्यांच्या चिमुरड्यावर झडप घातली. ज्ञानेश्वर असं या चिमुरड्याचं नाव आहे.  


'आम्ही रात्री झोपलेलो असताना बिबट्यानं माझ्या मुलाला पकडून खेचून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. हालचालीमुळे मला आणि माझ्या पतीला जाग आली आणि आम्ही आमच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला' असं या चिमुरड्याच्या आईनं - दीपाली यांनी म्हटलंय. 


बिबट्या चिमुरड्याला खेचत असताना दीपालीनं मुलाचे पाय पकडून ठेवले... आणि तिच्या पतीनं बिबट्यावर प्रतिहल्ला सुरू केला.... सोबतच त्यांच्या आरडा-ओरडीमुळे लोकांनाही याची कुणकुण लागली. लोक मदतीसाठी जमा झाल्यानं बिबट्यानं मुलाला सोडून पळ काढला. 


बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्या ज्ञानेश्वरच्या चेहऱ्यावर तसंच डोळ्यांना जखम झालीय. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.