विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण :  केंद्रात , राज्यात आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही  शिवसेना आणि  भाजपाची युती आहे. मात्र, आपापसातील हेवेदाव्यांमुळे आणि शिवसेनेच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे कल्याण डोंबिवली शहरांतील विकासकामाला खीळ बसत आहे.. शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आम्ही शिवसेनेला साद घालत आहोत..शिवसेना आणि भाजप दोन्हींही  पक्षांनी एकत्र काम करणे आवश्यक असल्याचे मत भिवंडी लोकसभा संघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले. आम्ही सेनेला साद  घातली असून त्यांनी " ओ " द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने  शनिवारी आयोजित केलेल्या 'दिलखुलास संवाद' या  कार्यक्रमात कपिल पाटील बोलत होते. पुढे ते म्हणाले की, भाजप आणि सेना भेदभाव न करता आपले सरकार आहे या भावनेने काम करणे आवश्यक आहे.  वालधुनी शुद्धीकरण प्रकल्प, आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडची समस्या आणि इतर विकासात्मक कामे  मार्गी लावून  नागरिकांना  उत्तम  सोयीसुविधा देण्यासाठी  सेना आणि भाजपने " सबका साथ सबका विकास "  याप्रमाणे  एकत्रिपणे काम करणे अत्यंत आवश्यक आहे मात्र शिवसेना विनाकारण प्रत्येक गोष्टीचे राजकारण करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.


कल्याण डोंबिवलीत येणाऱ्या मेट्रो रेल्वे आणि माणकोली पुलावरून असणाऱ्या कुरघोडीच्या राजकारणाला त्यांनी शिवसेनेला जबाबदार धरत शिवसेनेवर जोरदार टीका केली. मेट्रोच्या कामात कोणीही राजकारण किंवा कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू नये. कल्याण -डोंबिवलीत येणाऱ्या मेट्रोचे श्रेय फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असल्याचा टोला पाटील यांनी  खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेता  लगावला. 


माझ्या मतदार संघात लोढा यांचा एकही प्रकल्प नाहीये. उलटपक्षी कल्याणातून शिळफाटामार्गे जाणाऱ्या मेट्रोच्या मार्गात लोढा यांचा पलावासारखा मोठा प्रकल्प येतो. यातूनच लोढांच्या फायद्यासाठी कोण काम करतंय याची प्रचिती येते असेही त्यांनी खासदार डॉ. शिंदे यांचे नाव न घेता त्यांना चांगलाच टोमणा हाणला..तसेच डोंबिवली ते माणकोली रखडलेल्या पुलाचा प्रश्न आपण लवकरच मार्गी लावणार असून स्वतः सीएम सुद्धा जातीने यावर लक्ष ठेऊन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. माणकोली प्रकरणी सुद्धा शिवसेनेने दुटप्पी भूमिका घेत एकीकडे शेतकऱ्यांचा पुळका असल्याचा दिखावा केला तर दुसरीकडे भूमिपूजन एक दिवस आधीच उरकण्याचा नाहक स्टंटबाजी केली. मात्र या पुलासबंधी जे काही प्रश्न आहेत ते आपणच सोडवणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. 


चांगले काम झाले तर आमच्यामुळे आणि वाईट गोष्ट झाली तर ती भाजपामुळे, हे कोणते यांचे राजकारण? असा सवाल करीत सत्ताधारी म्हणून चांगल्याबरोबरच वाईट गोष्टींचीही जबाबदारी आपण स्विकारली पाहीजे असा सल्लाही खासदार पाटील यांनी शिवसेनेला दिला. याठिकाणी ज्याप्रकारचे राजकारण होते तसे कुठेही केले जात नाही. किमान शहराच्या विकासकामांमध्ये तरी असले घाणेरडे राजकारण करू नये. त्यामुळे शहर विकासाचे अनेक चांगले प्रकल्प मागे पडल्याची खंत व्यक्त करीत आपण शिवसेनेबरोबर याबाबत कोणत्याही वेळी चर्चेसाठी तयार आहोत असं आवाहन त्यांनी केलं.


दरम्यान या कार्यक्रमात पत्रकारांच्या पॅनलने विचारलेल्या प्रश्नांना खादारांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली..आपल्या राजकीय प्रवासाबाबत सांगताना आपण आज जे आहोत ते आपल्या वडिलांमुळे आहोत. त्यांनी माझ्यावर जे संस्कार केले त्यामुळेच आपण इथपर्यंतच प्रवास करू शकलो अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी यावेळी दिली. कौटुंबिक जडण घडण, ग्रामपंचायत सदस्य ते खासदार पदापर्यंतचा प्रवास, मतदारसंघातील विकासकामे-नागरी प्रश्न, समस्या, नको तितक्या राजकारणामुळे ठाणे जिल्ह्याची झालेली पीछेहाट, भविष्यातील राजकीय प्रवास आदी महत्वाच्या विषयांवर अत्यंत मनमोकळेपणे आपली मतं व्यक्त केली.