छत्रपती संभाजीराजेंनी शेतात जाऊन केली पेरणी; VIDEO व्हायरल
स्वतःच्या घामाने धरणी मातेला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात याचा अनुभव घेता आला.
कोल्हापूर:सध्या मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे कोल्हापूर जिल्हा पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली परिसरातील एका शेतात अशीच पेरणी सुरू होती. त्यावेळी खासदार संभाजीराजे यांनी चक्क शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत तिफणी ओढली. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
स्वतःच्या घामाने धरणी मातेला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात याचा अनुभव घेता आला. तिफणीला ओढताना एका फेरीतच माझा श्वास फुलून गेला. मला लगेच मास्क काढून ठेवावा लागला, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
कोरोनामुळे संपूर्ण जगाला थांबावं लागलं. पण बळीराजाला थांबून चालणार नाही, अन तो थांबणारही नाही इतकंच नाही तर हा अनुभव मला समृद्ध करून गेला. जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाचे संपूर्ण जगाने ऋण व्यक्त करत त्यांचा सन्मान केला पाहिजे अशी भावना संभाजीराजे यांनी व्यक्त केली.