विरोधकांकडून PMपदाची ऑफर, गडकरींच्या दाव्यावर राऊत स्पष्टचं म्हणाले, ज्या पद्धतीची हुकूमशाही...
Sanjay Raut: नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदाची ऑफर असल्याचा दावा केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Raut: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी एका ज्येष्ठ विरोधी पक्षनेत्याने संपर्क करुन मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती. तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ, असं मला विचारण्यात आलं होतं, असा दावा नितीन गडकरी यांनी केला होता. नितीन गडकरींच्या या दाव्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे सर्व मान्य असे नेते आहेत. त्यांना पंतप्रधान पदासाठी तडजोड करा, असं कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही. मुळात या देशात ज्या पद्धतीची हुकूमशाही एखाधिकारशाही सुरू आहे. ज्या पद्धतीने आणीबाणी लावण्याचा प्रयत्न सुरू केला. दहा वर्षापासून सुरू आहे. त्याच्याशी तडजोड करू नका त्या प्रवृत्तीची तडजोड करू नका ही भूमिका त्यांच्याकडे कोणी जर मांडली असेल तर विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याने त्यात चुकीचं केलं असं आहे मला वाटत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आज जे सरकारमध्ये बसून सध्याच्या या देशातल्या मूल्यांशी तडजोड करत आहेत. लोकशाही असेल स्वातंत्र्य असेल न्यायपालिका असेल तो एक राष्ट्रीय अपराध आहे असे मी मानतो आणि नितीन गडकरी या सगळ्याच्या विरुद्ध सातत्याने बोलत राहिले आवाज उठवत राहिले आपल्या भूमिका मांडत राहिले म्हणून जर त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याने ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांनी जर हा त्यांना सल्ला दिला असेल त्याच्यामध्ये फार पिडा होण्याचं कोणाला कारण नाही, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
जगजीवन राम यांनी 1977 साली काँग्रेस पक्षातून याच मूल्यांसाठी बंड केलं होतं आणि इंदिरा गांधीचा पराभव झाला होता. जर देशात स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल न्यायपालिकेचे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर काही जणांना सत्तेतल्यांचा त्याग करावा लागतो तो त्याग केला म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळाले, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
नितीन गडकरी काय म्हणाले?
मी कोणाचंही नाव घेणार नाही. मात्र मला एका त्या व्यक्तीने विचारलं होतं. तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ. मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पाठिंबा का द्याल? तसंच मी तुमचा पाठिंबा का घेऊ? पंतप्रधान होणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही. मी माझी मूल्यं, विचार आणि माझी संघटना यांच्याशी प्रामाणिक आहे. मी कुठल्याही पदासाठी तडजोड करत नाही. मला माझ्या मूल्यांवर विश्वास आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. नागपूरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.