Shrikant Shinde on Sanjay Raut: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shnide) यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याचा संजय राऊतांचा आरोप आहे. यासंबंधी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं असून खळबळ माजली आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या आरोपावर श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीकांत शिंदे अंबरनाथमध्ये विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी संजय राऊत धमकी प्रकरणावर भाष्य केलं. ते म्हणाले की "ज्या चिंदरकर यांनी संजय राऊत यांना त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली त्या चिंदरकरांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  मला संजय राऊत साहेबांची काळजी वाटत असून त्यांच्याबद्दल सहानभूती आहे".
 
"संजय राऊत रोज बिनबुडाचे आरोप करत असतात. त्यांना सिझोफ्रेनियासारखा (Schizophrenia) आजार होतोय का असं मला वाटत आहे. त्यांना तशी लक्षणं दिसत असूनते आभासी विश्वात राहत आहेत. त्यांची राज्याला गरज आहे. त्यांना जर उपचाराची गरज असेल तर मी चांगला डॉक्टर त्यांना सुचवेन," असंही त्यांनी उपहासात्मकपणे म्हटलं आहे. 


"संजय राऊत रोज सकाळी मनोरंजन करत असतात, त्यामुळे त्यांनी प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे असं आपल्याला वाटतं," असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. 


संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटलं आहे?


प्रिय देवेंद्रजी,
जय महाराष्ट्र
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे.