Supriya Sule on Ajit Pawar: मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवारी देणं चूक होती अशी कबुली दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात आगामी काळातील राजकारणावर याचे पडसाद उमटणार का? अशी चर्चाही यानिमित्ताने रंगली आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी यावर जास्त भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्यांना दोन शब्दांत यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले होते. जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी आपली नाराजी जाहीर करत शरद पवारांची साथ सोडली आणि महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांनी शरद पवारांवर अनेक गंभीर आरोप केले होते. दरम्यान, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिलं होतं. यामुळे लोकसभा निवडणुकीत नेमकं काय चित्र असेल याकडे सर्वांचं लक्ष होतं. त्यातच सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात निवडणुकीत उतरवल्याने बारामती मतदारसंघाची लढत हायव्होल्टेज ठरली होती. मात्र आता अजित पवारांनी ही आपली चूक होती असं म्हटलं आहे. 


अजित पवार नेमकं काय म्हणाले?


अजित पवारांना लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रश्न विचारलं असता त्यांनी कबुली देत म्हटलं की, “सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली". 


पुढे ते म्हणाले, "मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं. आज मला माझं मन सांगतं आहे की तसं व्हायला नको होतं”.


सुप्रिया सुळेंचं दोन शब्दांत उत्तर


सुप्रिया सुळेंना प्रसारमाध्यमांनी यावर प्रतिक्रिया विचारली असता त्या रामकृष्ण हरी इतकंच म्हणत जास्त भाष्य करणं टाळलं. "एकतर मी हे विधान ऐकलेलं किवा वाचलेलं नाही. तुमच्याकडूनच मी हे ऐकत नाही. त्यामुळे रामकृष्ण हरी".