MPSC Recruitment 2023: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण 379 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्राध्यापक पदाच्या एकूण 32 जागा भरल्या जातील. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीएचडी पूर्ण करणे आवश्यक आहे.  यासोबतच SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 10 संशोधन प्रकाशने पूर्ण असणे आवश्यक आहे. प्राध्यापक पदाचा 10 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य मिळणार आहे. प्राध्यापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 1 लाख 44 हजार 200 ते 2 लाख 18 हजार 200 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. 


असोशिएट प्रोफेसरच्या एकूण 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केलेली असावी. तसेच त्यांच्याकडे 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी असावी.  उमेदवाराकडे SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 07 संशोधन प्रकाशने असावीत. तसेच त्याच्याकडे सहयोगी प्राध्यापक पदाचा एकूण 8 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 1 लाख 31 हजार 400 ते 2 लाख 17 हजार 100 रुपये इतका पगार दिला जाईल. 


सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक पदाच्या एकूण 214 रिक्त जागा भरल्या जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी/शारीरिक शिक्षण आणि क्रीडा किंवा शारीरिक शिक्षण किंवा क्रीडा विज्ञान/लायब्ररी सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स किंवा डॉक्युमेंटेशन सायन्स पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. नेट/सेट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 57 हजार 700 ते 1 लाख 82 हजार 400 रुपये इतका पगार दिला जाईल.


लेक्चररच्या एकूण 86 रिक्त जागा भरल्या जातील. यासाठी उमेदवारा बीएड असावा. तसेच त्याच्याकडे संबंधित विषयात किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी असावी. लेक्चरर पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 44 हजार 900 ते 1 लाख 42 हजार 400 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.  


एमपीएससी अंतर्गत रिक्त जागांव अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी 19 ते 45 वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांना यातून 5 वर्षे सवलत देण्यात येणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांना अर्ज शुल्कातून सवलत दिली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र आमदारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून 9 नोव्हेंबर 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे.