मुंबई : एमपीएससीचा २०१९ वर्षाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत साताऱ्याचा प्रसाद चौगुले हे सर्वसाधारण गटातून पहिला आला आहे. तर मागासवर्गातून उस्मानाबादचा रवींद्र शेळके आणि महिलांमधून अमरावतीची पर्वणी पाटील पहिली आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १३ ते १५ जुलै २०१९ रोजी ४२० पदांसाठी एमपीएससीची परीक्षा घेतली होती. तर पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेकरता ३,६०,९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. यातून मुख्य परीक्षेकरता ६,८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. 


पूर्व परीक्षेनंतर निश्चित झालेल्या उमेदवारांची अंतिम परीक्षा १३ जुलै ते १५ जुलै २०१९ रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे घेण्यात आली. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी १,३२६ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले. 


एमपीएससीच्या निकालानंतर उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करता येणार आहे. ज्या उमेदवारांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची आहे त्यांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठवण्याच्या दिनांकापासून १० दिवसात आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.