`...तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन...`; शरद पवारांचा शिंदे सरकारला अल्टीमेटम
Sharad Pawar Warning To Government: शरद पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन यासंदर्भातील इशारा राज्य सरकारला दिला आहे.
Sharad Pawar Warning To Government: पुण्यामधील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन (MPSC Protest Pune) दुसऱ्या दिवशीही सुरुच राहिलं. बुधवारी रात्री पुण्यातील रस्त्यांवर उतरुन विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. आता या आंदोलनामध्ये थेट रस्त्यावर उतरुन आपण विद्यार्थ्यांबरोबर आंदोलन करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी केली आहे. दरम्यान शरद पवारांच्या या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या विषयासंदर्भात आज (गुरुवार, 22 ऑगस्ट 2024 रोजी) तातडीने बैठक बोलावली आहे.
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार यांनी बुधवारी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन एक पोस्ट केली. "पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत," असं पवार यांनी म्हटलं आहे. एवढ्यावरच न थांबता शरद पवारांनी या विषयावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी सरकारला 22 ऑगस्टपर्यंतचा अल्टीमेट दिला आहे.
...तर मी स्वत: मैदानात उतरणार
"उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार," असं पवारांनी बुधवारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक बोलावली आहे. आज सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार आहे.
विद्यार्थ्यांची मागणी काय?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे म्हणजेच एमपीएससी मार्फत 25 ऑगस्ट रोजी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागातील 258 पदांचा समावेश करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याच मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी पुण्यात मंगळवारी रात्री ठिय्या आंदोलन सुरू केलं. बुधवारीही हे आंदोलन सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही बुधवारी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला.
रोहित पवार यांचीही हजेरी
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी रात्री विद्यार्थी आंदोलन करत असलेल्या ठिकाणी हजेरी लावली. या आंदोलनाचे काही फोटो आणि व्हिडीओ रोहित पवारांनी शेअर केले आहेत. "जसजशी रात्र होत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. पण सरकारचा प्रतिसाद बघता, “हम को उनसे वफा की है उम्मीद, जो नहीं जानते वफा क्या है”, अशी विद्यार्थ्यांची भावना असली तरी सरकारचा इगो आणि विद्यार्थ्यांची सहनशीलता यांच्यातल्या या लढाईत विद्यार्थ्यांची सहनशीलता नक्कीच विजयी होईल. असो! आता आमचं ठरलंय! नोटिफिकेशन काढत नाही तोपर्यंत उठायचं नाही," असं रोहित पवार यांनी एक्सवरुन म्हटलं आहे.
फडणवीस यांची विनंती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेत एमपीएससीच्या अध्यक्षांना विद्यार्थ्यांच्या या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.