ऑक्टोबर हिटमध्ये ग्राहकांच्या खिशाला चटका; महाराष्ट्रात वीजबील इतक्या पैशांनी वाढणार
Maharashtra Electricity Price Hike: मुंबई सह महाराष्ट्रात वीज मागणीत वाढ होत असताना आता ग्राहकांना वीद दरवाढीचा शॉक बसणार आहे.
Maharashtra Electricity Price Hike: ऑक्टोबर हिटचे चटके सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. घरगुती वीज ग्राहकांच्या प्रतियुनिट विजेच्या दरात 15 ते 35 पैशांनी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळं या महिन्यात येणारे वीज बिल वाढणार असल्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर हिटमध्ये उकाडा वाढू लागला आहे. वाढलेल्या तापमानामुळं अंगाची काहिली होत असताना नागरिकांकडून विजेचा वापर वाढला आहे. संपूर्ण दिवस घरातील फॅन, एसी, कुलर अशी उपकरणे सुरू असतात. त्यातच महावितरणाने वीजदर वाढवल्याने ग्राहकांच्या खिशाला चटका बसणार आहे. महावितरण प्रतियुनीट 15 ते 35 पैसे एवढी मोठी दरवाढ लागू करणार आहे.
महावितरणने उन्हाळ्यात जादा दराने खरेदी केलेल्या विजेचा इंधन अधिभार वसूल करण्यास याआधीच वीज आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, महावितरणने मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यातील इंधन अधिभार सप्टेंबरपासून पुढील तीन महिन्यात वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि कृषीपंपधारकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात महावितरणकडून सुमारे पावणेतीन कोटी वीज ग्राहकांना पुरवठा करण्यात येतो. वीजनिर्मिती करताना वापरण्यात येणाऱ्या इंधनाच्या दरात वाढ झाल्यास त्याच्या फरकाची रक्कम इंधन अधिभाराच्या माध्यमातून वसूल केली जाते. महावितरणाच्या या निर्णयामुळं या महिन्यात ग्राहकांना वाढीव वीजबिल येण्याची दाट शक्यता आहे.
ऑक्टोबर महिन्यात उकाडा वाढल्याने विक्रमी वीजमागणी नोंदवण्यात आली आहे. मागील आठवड्याभरापासून राज्यातील वीजमागणीत सातत्याने वाढ होत आहे. इतरवेळी ऑक्टोबर महिन्यात 22 हजार मेगावॉटदरम्यान असलेली वीज मागणी गेल्या काही दिवसांतच 24 हजार मेगावॉटच्यावर गेली होती. पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये उच्चांकी पातळी नोंदवण्यात आली होती.
ग्राहकांची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी ९,९०० मेगावॉट वीज महावितरणला बाहेरून खरेदी करावी लागली आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने ऑक्टोबर महिन्यात तापमान वाढले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कमाल तापमानाने 35 अंशापर्यंत वाढले आहे. त्यामुळं मागील आठवड्यापासून राज्यातील वीजमागणीतही वाढ होत आहे.