ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मोठी घोषणा केली. पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत अयोध्या (Ayodhya) दौऱ्याची तारीख घोषित केली. पाच जूनला पक्षातील सर्व सहकाऱ्यांसोत अयोध्येला  जाणार आहे, तिथे जाऊन दर्शन घेईन, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन त्यांनी देशभरातील नागरिकांना केले आहे. राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत, अशी मागणी केली होती. त्यानंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये देखील राज्य सरकारला हे भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा तापला आहे.


ठाण्यात जोरदार पोस्टरबाजी
राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मनसे तयारीला लागली आहे. ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरवर राज ठाकरे यांचा भगवी शाल पांघरलेला फोटो असून बाजूला राजतीलक की करो तयारी आ रहा है भगवा धरी असा उल्लेख बॅनर वर करण्यात आला आहे.


राज ठाकरे यांनी  हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक होत सत्ताधारी शिवसेना आणि महाविकास आघाडीसमोर आव्हान उभं केलं आहे. 


राज ठाकरे यांचा नवा लूक
महाराष्ट्रात चर्चा रंगलीय ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या लूकची. अंगावर भगवी शाल पांघरलेले राज ठाकरे. शिवाजी पार्कवर झालेला गुढीपाडवा मेळावा असो, ठाण्यातली उत्तरसभा असो, नाहीतर पुण्यातील हनुमान चालिसा कार्यक्रम. प्रत्येक ठिकाणी राज ठाकरेंचं भगवी शाल पांघरून स्वागत करण्यात आलं. अर्थात राज ठाकरेंचा हा नवा लूक पाहून सगळ्यांनाच आठवण होतेय ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची.