एमएसआरडीसीकडून पत्रीपुलाची नवी डेडलाईन
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
अतीश भोईर, झी मीडिया, ठाणे : गेल्या वर्षभरापासून वाहतूक कोंडीच्या नरकयातना भोगणाऱ्या कल्याणकरांसाठी एमएसआरडीसीने पत्रीपुलाची फेब्रुवारी 2020 ही नविन डेडलाईन जाहीर केली आहे. याबाबत माहिती देणारे 2 भलेमोठे फलक पत्रीपुलाच्या दोन्ही बाजूला लावले आहेत. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर पत्रीपुल बंद करण्यात आला. त्याला बरोबर एक वर्ष लोटले. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
तेव्हापासून आजपर्यंत केवळ 'तारीख पे तारीख'चा सिलसिला सुरूच आहे. त्यामध्ये आता एमएसआरडीसीने लावलेल्या नव्या बॅनरची भर पडली असून त्यामध्ये पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसपर्यंत या पुलाचे काम पूर्ण होण्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर हैद्राबाद येथे या पुलाचे गर्डरचे काम सुरू असून 22 पैकी 5 पाईल्सचे काम पूर्ण झाले आहे.
हैद्राबाद येथून डिसेंबर 2019 पर्यंत हे गर्डर येण्याचेही एमएसआरडीसीला अपेक्षित आहे. तर 2020 फेब्रुवारीच्या अखेरीसपर्यंत या पुलावरून वाहतूक सुरू होईल असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र गेल्या वर्षभरात पत्रीपुलाबाबत अनेक डेडलाईन देण्यात आल्या आहेत. त्यांचा अद्यापही कुठेच थांगपत्ता नसताना आता पत्रीपुलाचे काम पूर्ण होण्याच्या या नव्या डेडलाईनवर लोकांनी कोणत्या आधारे विश्वास ठेवायचा हा खरा प्रश्न आहे.