नागोठणे - रोहा दरम्यान दरड कोसळली, कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद
राज्यात सध्या पावसाचा जोर असून कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली.
मुंबई : राज्यात सध्या पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. नागोठणे ते रोहा दरम्यान कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली. त्यात कोसळत असलेला पाऊस यामुळे रुळावर चिखलाचे साम्राज्य दिसून येत आहे. त्यामुळे याचा फटका रेल्वे सेवेला बसला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे.
मुंबईहून कोकणकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच कोकणकडून मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. नागोठणे आणि रोहा दरम्यान झालेल्या दरड कोसळली. ही कोसळलेली दरड रेल्वे रुळावर आलेल्या चिखलामुळे मुंबईहून कोकणाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, कोल्हापुरातून गगनबावडा मार्गे कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. ही दरड हटविण्याचे काम सुरु आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत
रायगड जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अंबा, सावित्री नद्यांनी बुधवारी सकाळी धोका पातळी ओलांडली, त्यामुळे नागोठणे आण महाड परिसरातील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली.
पाताळगंगा नदीने धोकापातळी ओलांडल्याने सावरोली येथील पूल पाण्याखाली गेला आहे. तर जांभूळपाडा पुल पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक थांबविण्यात आली. मोर्बा पूलावरून पुराचे पाणी गेल्याने माणगाव श्रीवर्धन वाहतूक रोखण्यात आली आहे.
रोहा खिंडीत दरड कोसळल्याने नागोठणे रोहा दरम्यानची वाहतूक बंद झाली. ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने माणगाव पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. भोर घाटही बंद असल्याने दक्षिण रायगडमधून पुण्याला जोडणारे दोन्ही मार्ग बंद झाले. मरुड रोहा मार्गावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत आहे