कोल्हापूर : हलगीचा ठेका आणि कैताळाचा आवाज, उतारीचा शिणगार याच्या संवादात कोल्हापूर जिल्ह्यातील उदगांव इथला श्री जोगेश्वरी देवीच्या यात्रेच्या तिसर्‍या दिवशी अकराशे वर्षाची परंपरा असलेला मुकुट खेळ हजारो भाविकांनी अनुभवला. मुकुटाला खिजवून पळत असलेला सवंगडी त्याच्या पाठीमागे लागणारा मुकुट हा थरारक खेळ भाविकांनी आपल्या डोळ्यात टिपला. हा मुकुट खेळ पाहण्यासाठी उदगांवमध्ये भाविकांनी तुडूंब गर्दी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या चार दिवसापासून शिरोळ तालुक्यातील उदगांव मध्ये  जोगेश्वरी यात्रा सुरू आहे. मंगळवारी श्री जोगेश्वरी मंदिरातून देवीची मुकूटे सकाळी सहा वाजता बाहेर काढण्यात आली. एक नर, दोन मादीचे मुकुटे व सुपाचा मुकुटाच्या खेळाला सुरूवात झाली. 


प्रथम जोगेश्वरी मंदिर ते परटाच्या कमानीपर्यंत मुकुट खेळवण्यात आले. यात डोक्यावर मुकुट घेवून हातात वेताची काठी व पाठीमागे धारणारी व्यक्ती असते. यावेळी मुकुटाला खिदवून पळणार्‍या अनेक सवंगड्यांनी मुकुट धारकाच्या हातातील वेताच्या काठीचा मार झेलला. यात अनेक तरूण शालेय मुले, भाविकांनी मुकुट खेळून उत्साह वाढविला. गर्दीतून शिट्ट्या, टाळ्यांचा आवाज शिगेला गेला होता.


त्यानंतर ग्रामपंचायत, गावचावडी, गणपती मंदिर, महादेवी मंदिरापर्यंत खेळ खेळविण्यात आले. त्यानंतर 12 च्या सुमारास मुकुटाकडून नारळ देण्यात आला. मुकुटासमोर जाऊन तरूणांनी मकुटाची काठी न खाता नारळ उचलल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. त्यानंतर धार्मिक विधी व मानपान झाल्यानंतर मुकुट खेळाची सांगता झाली. या मानपानानंतर मुकुटे श्री जोगेश्वरी मंदिराकडे नेऊन मुकुटांची मंदिरात स्थापना करण्यात आली.