सिंधुदुर्गः पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी रात्रीपासून मुंबईसह कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. 29 जूनपर्यंत मान्सून राज्य व्यापणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मात्र, पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल केली आहे. एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. कोकणात जाणारे चाकरमानी या महामार्ग सुरू होण्याची अतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता समोर आलेल्या एका व्हिडिओमुळं संताप व्यक्त होत आहे. पहिल्याच पावसाने मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल केली असल्याची तक्रार व्यक्त करण्यात येत आहे. 


कणकवलीत चक्क महामार्गामुळे सर्व्हिस रोडवर धबधबे वाहताना दिसून आले आहेत. कणकवली येथे महामार्गावर मोठा पूल बांधण्यात आला आहे. आता या ब्रिजच्या कामाबद्दल वारंवार शंका व्यक्त केल्या जात होत्या. त्यातच पहिल्या पावसाने या ब्रिजवरून अनेक धबधबे वाहताना दिसून आले आहेत.


पुलावरुन दुधडी भरुन पाणी खाली पडताना दिसत आहे. ब्रिजवरुन पडणाऱ्या या पाण्यामुळे सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या वाहनांना व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अजून पावसाने हवा तसा जोर धरलेला नसताना पहिल्याच पावसात महामार्गाची ही अवस्था आहे. त्यामुळं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 



गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन सुरू करणार


19 सप्टेंबरला गणेशोत्सव आहे. राज्यभरातून चाकरमानी गणपतीसाठी कोकणात जातील. यावेळी प्रवासात अडथळा नको म्हणून गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा हायवेवरील सिंगल लेन सुरू करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे. अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. मुंबई गोवा मार्गासंदर्भातील उपाययोजना तातडीने करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 


दरम्यान, मान्सून अजूनही कोकणात रेंगाळलेला आहे. शुक्रवारच्या दुपारपासून पावसाने कोकणात जोर धरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, सावंतवाडीतील काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस बरसणार आहे, असा इशारा हवामान विभागाने केला आहे. खरंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाला सुरुवात होत असते. मात्र यंदा पावसाच्या सुरुवातीलाच पावसानं ओढ दिली. जून महिन्यात आत्तापर्यंत 20.7 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झालीय..हे प्रमाण सरासरीपेक्षा 81 टक्क्यांनी कमी आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आता आर्द्रा नक्षत्रात पावसाची रिमझिम सुरु झाली आहे.