Mumbai - Goa Highway News : तब्बल 12 वर्षे रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे आज चौथ्यांदा भूमिपूजन झाले आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पळस्पे ते कासू मार्गाच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन खारपाडा टोलनाका इथं झाले. यावेळी गडकरी यांनी मोठी घोषणा केली. कोणत्याही परिस्थितीत  डिसेंबर महिना अखेर संपूर्ण महामार्ग पूर्ण होईल, असे गडकरी यांनी जाहीर केले. मुंबई - गोवा महामार्गाबाबतीत मी दुःखी आहे. 10 हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत.  या रस्त्याच्या कामानंतर पर्यावरणाच्या दृष्टीने फायदा होईल, असे गडकरी म्हणाले.


'मुंबई - गोवा महामार्गाचं काम 9 महिन्यांत पूर्ण करणार'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, गेल्यावर्षी इंदापूर ते कासू दरम्यानच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झालं होते. अजूनही त्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये नाराजीचा सूर आहे. दरम्यान आजच्या भूमिपूजनामुळे कामाला गती येईल असा दावा खासदार सुनील तटकरे यांनी केलाय.  मुंबई-गोवा महामार्गाचं काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. यावेळी मुंबई - गोवा महामार्गाचं काम 9 महिन्यांत पूर्ण करण्याची जबाबदारी घेत असल्याचे गडकरींनी म्हटले. तसेच कामं न केल्यास, कामांमध्ये अडचणी आणणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.


'आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न' 


पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे काम यावर्षी डिसेंबरच्या आत पूर्ण करण्यात येणार, आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न राहिल, असे गडकरी म्हणाले. रस्त्यावर  6- 8 इंच टॉपिंग करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. चारपदरी मार्ग तयार करण्यात येणार आहे. तसेच अपघात निवारण समिती स्थापन करण्यात येणार आहे. दर दोन महिन्यांनी बैठक घेऊन ब्लॅक स्पॉट, अपघातस्थळची पाहणी करावी, असे सूचविण्यात आले आहे.


राज्यात सॅटेलाईट बेस टोल तयार करणार


राज्यात सॅटेलाईट बेस टोल तयार करण्यात येणार आहेत. जेएनपीटी ते दिल्ली 12 तासात पोहचता येणार आहे. कळंबोली येथील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यात येणार आहे. एकूण सुमारे 15 हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. नवीमुंबई एअरपोर्ट येथे पोहचण्यासाठी वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. कोकणातील पर्यटन वाढीसाठी ऍम्फीबीअस सी - प्लेनचे नियोजन करण्याचा विचार आहे. कोकणाचा आर्थिक, औद्योगिक विकास करण्याची गरज आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले.


दरम्यान, यावेळी त्यांनी  मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची हवाई पाहणी केली. चिपळूणच्या परशुराम घाटाची देखील नितीन त्यांनी पाहणी केली. मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही गडकरींनी दिलीय.