`मुंबई लोकल`, सहकार कायदा; फोन टॅपिंग आणि खडसे प्रकरणावर अजितदादा पाहा काय म्हणाले...
मुंबई लोकलमधून (Mumbai Local) सध्या सर्वसामान्यांसाठी प्रवास करण्यास बंदी आहे. सामान्यांसाठी लोकलचा प्रवास कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
पुणे : मुंबई लोकलमधून (Mumbai Local) सध्या सर्वसामान्यांसाठी प्रवास करण्यास बंदी आहे. सामान्यांसाठी लोकलचा प्रवास कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्याचवेळी ज्यांनी लसीचे डोस घेतले आहेत, त्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी होत आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप काहीही सांगण्यात येत नाही. दरम्यान, मुंबई लोकल प्रवासाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pwar) यांनी भाष्य केले आहे.
अजित पवार यांचा इशारा, 'दोन डोस घेतले तरी.... '
दरम्यान, मुंबई लोकल सामान्य जनतेसाठी कधी सुरु करण्यात येणार, यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता बाकी सर्वांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. कोरोनामुळे लोकलवर कोविड-19बाबत लादलेले निर्बंध कधी उठवले जाणार, हा प्रश्न कळीचा बनला आहे. यावर मंत्री वडेट्टीवार यांना विचारले असता त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत केली आहे. लोकलबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा लागणार आहे. जो काही निर्णय असेल तो स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तज्ज्ञांशी आणि संबंधितांशी चर्चा करून घेणार आहेत. दर शुक्रवारी राज्यातील कोरोना स्थितीचा टास्क फोर्स मार्फत आढावा घेतला जातो. त्यानंतर त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाते. त्यानंतर ते पुढील निर्णय घेतले जातात, असे सांगितले.
आता अजित पवार यांनीही मुंबई लोकल संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबई लोकल कधी सुरु होईल, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच जाहीर करतील. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत कधी घोषणा करणार याचीच मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, रेल्वे प्रवासी संघटना अधिक आक्रमक झाली आहे. ज्यांनी कोरोना लसीचे डोस घेतले आहेत. त्यांना तरी रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे. अनेक प्रवाशांकडून ही बंदी उठविण्याची मागणी करण्यात आली आहे.
100 वर्षांपूर्वीच सहकार अस्तित्वात आहे. राज्यांनी तसे कायदे नियम बनवलेले आहेत. केंद्राने केंद्राचे काम करावे. जसे संरक्षण विषयात राज्य काही करू शकत नाही. तरीदेखील सहकार विभाग स्थापन करण्या मागे काय उद्देश आहे, त्यात नेमके काय नियम केले जातात हे कळल्यानंतरच अधिक बोलता येईल, असे अजित पवार म्हणाले. डिझेल आणि पेट्रोलवरील कर आम्ही वाढवले नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जो कर घेतला जात होता तोच कर घेतला जातो. इंधनातून मिळणाऱ्या कराचा मोठा वाटा केंद्र सरकारला जातो. त्यांनी दिलासा दिला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, अधिवेशनात काय झाले हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. लोकप्रतिनिधी जर चुकीचे वागत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, असे न्यायालयाने सांगितलेले आहे. त्या दिवशी सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. परंतु त्यांनी गोंधळ घातला गेला, असे अजित पवार म्हणाले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याबाबतीत काय चालले आहे आणि कसं चालले आहे हे आपण पण समजू शकता. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या संदर्भात फोन टॅपिंगच्या बातमीत तथ्य आहे. लोकप्रतनिधींच्या बाबतीत वेगळं नाव वावरून फोन टॅपिंग करणे चुकीचे आहे. काही जण स्वतःच्या राजकीय स्वार्थ करता हे काम करतात, असा आरोप यावेळी अजित पवार यांनी विरोधकांवर नाव न घेता केला.