Airoli Kalwa Elevated Railway Project: मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. ठाणे स्थानकातील गर्दीचा भार हलका होण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असते. ठाणे स्थानकातील गर्दी विभागण्यासाठी व कळवा-मुंब्रा स्थानकातील गर्दीचा भार कमी करण्यासाठी कळवा-ऐरोली उन्नत मार्गाच्या कामाची सुरुवात झाली आहे. मंगळवारी रात्री या मार्गावरील पुलाची पायाभरणी करण्यात आले असून अन्य कामेदेखील सुरु करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदी यांनी 2016मध्ये या मार्गाचे भूमीपूजन केले होते. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-3 मध्ये जाहीर केलेल्या विविध प्रकल्पांत कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम रखडल्याने प्रकल्पाला उशीर झाला आहे. 


मुंबई रेल्वेचे मुख्य प्रवक्ता सुनील उदासी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री एमयूटीपी-3 अंतर्तंग असलेल्या ऐरोली-कळवा प्रकल्पासाठी दीघा गाव रेल्वे स्थानकाजवळ एमआयडीसी रोडवर 45.7 मीटर स्पॅन (145 मीट्रिक टन वजन) चा एक ओपन वेब स्टील गर्डर लाँच करण्यात आला आहे. हे काम दोन टप्प्यात होणार आहे. 


पहिल्या टप्प्यात दीघा गाव स्थानकाचे कामाचा समावेश असून ते पूर्ण झाले आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात उन्नत मार्गाचे काम सामील आहे. स्थानकांव्यतिरिक्त अन्य कामांमध्ये रात्री पुलांची संख्या 36/4 आणि 36/5 आणि 45.7 मीटरचा स्पॅन गर्डरचे बांधकाम करण्यात येईल. या रेल्वे प्रकल्पासाठी साधारण 476 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 


ऐरोली-कळवा उन्नत प्रकल्पामुळं वाशी-बेलापूरहून थेट कल्याणपर्यंत ट्रेन जाईल. ऐरोली ते कळवा मार्ग जोडण्यात आल्यानंतर ठाणे स्थानकातील गर्दी कमी होणार आहे. इतकंच नव्हे तर, नवी मुंबईहून कळवा किंवा त्याच्या पुढे प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचणार आहे. आजपर्यंत कळवा आणि ऐरोलीपर्यंत एकही ट्रेन थेट चालवण्यात आलेली नाही. नागरिकांना ठाणे स्थानकात उतरुन ट्रेन बदलावी लागायची. 


ऐरोली ते कळवा उन्नत मार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यावर कल्याण, डोंबिवली,टिटवाळा, बदलापूर, कर्जत, कसारा या मार्गावरील स्थानकातून ठाणे स्थानकात न जाता थेट नवी मुंबईतील पनवेल, बेलापूर, नेरुळ आणि वाशी स्थानक गाठता येणार आहे. दररोज साडेसहा लाख प्रवासी रोज ये-जा करतात. त्यामुळं ठाणे स्थानकात खूप गर्दी होते. या प्रकल्पामुळं ठाणे स्थानकातील गर्दी कमी होणार आहे.