वसई-विरारकरांचा प्रवास आरामदायी होणार, 12 नवीन लोकल धावणार, `या` तारखेपासून नवं वेळापत्रक लागू
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. कारण पश्चिम रेल्वेवर 12 लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. पण गेल्या काही वर्षांपासून लोकलची गर्दी वाढत चालली आहे. अनेकदा वाढत्या गर्दीमुळं प्रवाशांना दुखापत होण्याच्या घटनादेखील वाढल्या आहेत. त्यामुळं रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्यात यावा, अशी मागणी वारंवार प्रवाशांकडून करण्यात येत असते. आता प्रवाशांची ही मागणी रेल्वे प्रशासनाने मान्य केली आहे. पश्चिम रेल्वेकडून उपनगरीय सेवेचं नवं वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे. 12 ऑक्टोबरपासून हे वेळापत्रक लागू केले जाणार आहे.
मध्य रेल्वेने अलीकडेच लोकलच्या वेळापत्रकात बदल केला होता. 5 ऑक्टोबरपासून हे वेळापत्रक लागू झाले आहे. तर, आता पश्चिम रेल्वेनेही नवं वेळापत्रक तयार केलं आहे. या वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वेवर 12 फेऱ्यांचा समावेश केला आहे. यामध्ये सध्या सुरू असलेल्या सहा फेऱ्यांना पुढे सुरू ठेवण्यात आलं आहे. तर 10 लोकलचं अपडेशन करण्यात येणार असून 12 डब्यांऐवजी 15 डब्यांसह धावणार आहेत.
नव्या वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वेवर सुरू असणाऱ्या लोकलच्या फेऱ्यांची संख्या 1394 वरुन 1406 पर्यंत वाढणार आहे. विरार ते चर्चगेट अशी एक फास्ट लोकल नव्याने सुरू करण्यात येणार आहे. तर, डहाणू रोड ते विरारपर्यंत दोन स्लो लोकल चालवल्या जाणार आहेत. अंधेरी, गोरेगाव आणि बोरीवली येथून चर्चगेटसाठी एक धीमी लोकल चालवण्यात येणार आहे. चर्चगेट ते नालासोपारापर्यंत फास्ट आणि चर्चगेट ते गोरेगाव अशी दोन स्लो लोकल चालवण्यात येणार आहे.
चर्चगेट ते अंधेरीपर्यंत एक धीमी लोकल आणि विरार ते डहाणू रोडपर्यंत दोन धिम्या लोकल चालवल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वेचे नवं वेळापत्रक 12 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. लोकलच्या 12 फेऱ्या वाढल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. लोकल वाढल्याने प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार आहे. दरम्यान, सध्या पश्चिम रेल्वेवरील मालाड ते कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून यासाठी मेजर ब्लॉकचे आयोजन करण्यात येणार आहे.
आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर देखील 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मार्गावरुन पनवेल-बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल तसंच, पनवेल ठाणे दरम्यानच्या ट्रान्सहार्बर मार्गावरील दोन्ही दिशेच्या सेवा बंद राहणार आहेत. तसंच, बेलापूर-उरण आणि नेरूळ-उरण सेवा मात्र सुरू राहणार आहेत. गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पाचव्या मार्गिकेवर शनिवारी रात्री 11 ते रविवारी सकाळी 9 पर्यंत 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.