Mumbai Local Train News: मध्य रेल्वेवर लवकरच आणखी एका स्थानकाची भर पडणार आहे. या नव्या स्थानकामुळं अंबरनाथ आणि बदलापूरयेथील रहिवाशांना मोठा फायदा होणार आहे. गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच या चिखलोली या नव्या रेल्वे मार्गाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने (MRVC) बुधवारी नवीन रेल्वे स्थानकासाठी 1.93 कोटींचे कत्रांट काढले आहे. (Mumbai Local Train News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये चिखलोली स्थानक आणि रेल्वेच्या प्रस्तावित तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेसाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने निविदा काढल्या आहेत. कल्याण ते बदलापूरपर्यंत रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका आणि नवीन चिखलोली स्थानक येत्या काही वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या स्थानकाची मागणी होत होती. अखेर आता रेल्वेने निविदा काढल्याने या प्रकल्पास गती मिळू शकणार आहे. 


मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान सात किमीचे अंतर आहे. या रेल्वेमार्गाच्या मधल्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वस्ती व नागरिकीकरण झाले आहे. त्यामुळं या मधल्या भागात चिखलोली स्थानक व्हावे, अशी मागणी स्थानिकांकडून गेल्या कित्येत वर्षांपासून होत आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या स्थानकासाठी पाठपुरावा केला होता. रेल्वेकडून या स्थानकाच्या जागेसाठी भूसंपादन आणि इतर प्रक्रियेला वेगही आला होता. तर, 28 डिसेंबर 2022 रोजी मध्य रेल्वेने अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकाच्यामध्ये चिखलोली रेल्वे स्थानकाच्या थांब्याला परवानगी दिल्याचे परिपत्रक काढत परवानगी दिली होती. 


कोणाला कसा फायदा होणार?


अंबरनाथ आणि बदलापूर शहरांबरोबरच दोन्ही शहरांच्या लगत असलेल्या गावांचाही झपाट्याने विकास होत आहे. या गावातील लोकांना लोकल पकडण्यासाठी अंबरनाथ किंवा बदलापूर गाठावे लागते. चिखलोलीसह जांभुळ, वसत आणि अंबरनाथ तालुक्यातील काही ग्रामीण भागांसाठी चिखलोली रेल्वे स्थानक महत्त्वाचे ठरणार आहे. अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकात  सकाळ-संध्याकाळी प्रचंड गर्दी असते. या स्थानकामुळं या दोन स्थानकांतील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकापासून चिखलोली रेल्वे स्थानकाचे अंतर ६४.१७ किमी असून अंबरनाथ ते चिखलोली रेल्वे स्थानकाचे अंतर ४.३४ तर चिखलोली ते बदलापूर रेल्वे स्थानकामधील अंतर ३.१ किमी आहे.