Mumbai Madgaon Special Train: हल्लीच्या दिवसांमध्ये प्रवासासाठी जायचंय असं म्हटल्यानंतर कुठे जाणार, कसे जाणार, कधी पोहोचणार? हे असे प्रश्न विचारणारी मंडळी आपल्याभोवती गराडा घालतात. कारण, प्रवास सर्वांनाच आवडतो. तुम्हीही त्यातलेच आहात का? काय म्हणता तुम्ही गोव्याला जायचा बेत आखताय? तुमच्यासारख्याच इतर असंख्य मंडळींसाठी ही खास बातमी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या आणि त्यांच्या हिताच्याच दृष्टीनं निर्णय घेणाऱ्या (Indian Railway) भारतीय रेल्वेच्या अख्त्यारितील (Central Railway) मध्य रेल्वेकडून मुंबई-मडगाव दरम्यान विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त एकेरी मार्गानंच म्हणजेच मुंबई ते मडगाव असा एकच प्रवास ही रेल्वे करणार आहे. 


मे महिन्याच्या सुट्टीच्या (Holidays) धर्तीवर प्रवास करणाऱ्यांची वाढीव संख्या लक्षात घेता आरक्षणं न मिळालेल्या प्रवाशांसाठी रेल्वेचा हा निर्णय फायद्याचा ठरत असून, या रेल्वेसाठी तिकीट आरक्षणासही सुरुवात झाली आहे. त्यामुळं तुम्ही जर गोव्याच्या दिशेनं किंवा कोकणात फेरफटका मारण्यासाठी जाणार असाल तर आताच या रेल्वेबाबतची इतर माहिती पाहून घ्या. 


रेल्वेची वेळ आणि स्थानकांबाबतची माहिती... 


मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी सुटणार असून, ती  मडगाव पर्यंत प्रवास करेल. ही गाडी क्रमांक 01149 शुक्रवार 9 जून रोजी सकाळी 5.30 मिनिटांनी CSMT येथून सुटेल. मडगाव येथे ती त्याच दिवशी सायंकाळी 5.20 मिनिटांनी पोहोचेल. 


शुक्रवारी सुटणारी ही विशेष रेल्वे दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, करमाळी या स्थानकांवर थांबणार असून, तिच्यामध्ये 16 कोच आहे. 1 जनरेटर कार, 1 एलएलआर कोच, 10 द्वितीय श्रेणी कोच, 3 एसी चेअर कोच आणि 1 विस्टाडोम कोच अशी विभागणी असेल. 


हेसुद्धा वाचा : भारीच! हा आहे जगातला सर्वाधिक अंतराचा Highway; प्रवासासाठी लागतात इतके महिने... 


दरम्यान, सध्याच्या घडीला कोकण ओलांडत गोव्यात पोहोचणाऱ्या या रेल्वेनं प्रवाशांना काही अंशी दिलासा दिला असला तरीही सध्या कोकणात असणारे चाकरमानी मात्र भलत्याच चिंतेत आहेत. मे महिन्याच्या सुट्टीच्या निमित्तानं बरीच मंडळी गावच्या दिशेनं रवाना झाली. पण, आता मात्र परतीच्या प्रवासासाठी निघत असताना रेल्वे आणि एसटी अशा दोन्ही मार्गांवरील आरक्षणं फुल्ल झाल्यामुळं या मंडळींना परतीच्या प्रवासासाठी जास्तीचे पैसे मोजून खासगी वाहनानं प्रवास करावा लागत आहे.