Mumbai Mhada Lottery: मुंबईत एक तरी हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकांची इच्छा असते. मुंबईकरांची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबईतील 1900 घरांसाठी जुलै महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होणार असून ऑगस्टमध्ये सोडत काढण्याची तयारी म्हाडाने केली आहे. म्हाडांच्या घरांसाठी लॉटरीची वाट पाहणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत घर घेणे हे मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. वनबीएचके घरांच्या किंमती या लाखो-करोडोंच्या घरात गेल्या आहेत. मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घर घेणे प्रत्येकालाच परवडेल असं नाही. त्यामुळं सर्वसामान्य नागरिक म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात. म्हाडा मुंबईसह राज्यातील अनेक शहरांत घरे उपलब्ध करुन देतात. स्वस्त दरात व मोक्याच्या जागी असलेली घरे सर्वसामान्यांना परवडतात. म्हाडाच्या मुंबई मंडळाने ऑगस्ट 2023 मध्ये मुंबईतील जवळपास चार हजार घरांची लॉटरी काढली होती. यासाठी तब्बल सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले होते. 


ऑगस्ट 2023मध्ये म्हाडाने गोरेगाव, विक्रोळी येथील घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यानंतर या वर्षासाठी म्हाडाची लॉटरी कधी प्रसिद्ध होणार याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. मात्र, आता अखेर ही प्रतीक्षा संपणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने जवळपास 1900 घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील ही घरं सर्व उत्पन्न गटासाठी असणार आहेत. या घरांसाठी जुलैमध्ये लॉटरीची जाहिरात निघणार आहे. तर, ऑगस्टमध्ये सोडत काढली जाईल, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, या घरांचे लोकेशन काय असणार हे मात्र अद्याप कळलेले नाहीये. 


हायफाय घरांचा समावेश


गोरेगाव प्रेमनगर येथील तब्बल 322 हायफाय घरांची उभारणी केली आहे. ही घरे 800 आणि 1000 चौरस फुटांच्या सदनिका बांधण्यात आल्या आहेत. या घरांचाही म्हाडा ऑगस्टमध्ये निघणाऱ्या सोडतीत समावेश करणार आहे. पण अद्याप या घरांच्या किंमती काय असणार हे जाहीर करण्यात आलेले नाहीये.