BMC Tax Collection : मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीकामी मोठ्या मालमत्‍ताधारकांकडे पाठपुरावा सुरू केला असून त्‍याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. चालू आर्थिक वर्ष २०२३ - २४  मध्ये मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्‍यात करनिर्धारण व संकलन विभागाला यश आले. करदात्‍या नागरिकांनी ३१ मार्च २०२४ पूर्वी कर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगरपालिकेचा करनिर्धारण व संकलन विभाग गत वर्षभरापासून सातत्याने कर वसुलीकामी पाठपुरावा करत आहे. आर्थिक वर्ष २०२३ - २०२४ ची सुधारित कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस निर्गमित झाल्यानंतर विविध प्रसार माध्यमांचा व समाज माध्‍यमांचा वापर करत नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मालमत्ता कर न भरलेल्यांची यादी जाहीर करून मालमत्‍ताधारकांना नोटीस देणे, थकबाकीदारांना टेलिकॉलिंग, एसएमएस करणे आदींवर भर दिला जात आहे.


करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांनाही नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीतकमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त मालमत्ता कर कसा वसूल केला जाऊ शकतो, याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे नागरिकांचे मालमत्ता कर भरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्‍यात आली आहे. आर्थिक वर्षातील उर्वरित ११ दिवसांत अधिकाधिक कर वसूल करण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.


मालमत्ताकर वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट  पूर्ण करण्यासाठी करनिर्धारण व संकलन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत. मालमत्ताधारकांनी सुद्धा मालमत्ता कर भरण्यासाठी स्वतःहून पुढे यावे.  थकबाकीदारांनी आपला थकीत मालमत्ता कर तसेच मालमत्‍ताधारकांनी आपला नियमित कर भरून महानगरपालिकेला  सहकार्य करावे असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्यात आले आहे


मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजीची विभागनिहाय मालमत्‍ताकर वसुली


१) ए विभाग - ५ कोटी ३९ लाख रूपये
२) बी विभाग - ६७ लाख ३७ हजार रूपये
३) सी विभाग - १ कोटी ६९ लाख रूपये
४) डी विभाग - ६ कोटी ९२ लाख
५) ई विभाग - १ कोटी ६३ लाख रूपये
६) एफ दक्षिण विभाग - ५३ लाख ७२ हजार रूपये
७) एफ उत्तर विभाग - ७९ लाख ९६ हजार रूपये
८) जी दक्षिण विभाग - ४ कोटी ४४ लाख रूपये
९) जी उत्तर विभाग - ३ कोटी ३१ लाख रूपये
१०) एच पूर्व विभाग - ५ कोटी ७२ लाख रूपये
११) एच पश्चिम विभाग - ५ कोटी ९० लाख रूपये
१२) के पूर्व विभाग - ७ कोटी ७२ लाख रूपये
१३) के पश्चिम विभाग - ५ कोटी ७३ लाख रूपये
१४) पी दक्षिण विभाग - २ कोटी ७८ लाख रूपये
१५) पी उत्तर विभाग - ३ कोटी १७ लाख रूपये
१६) आर दक्षिण विभाग - १ कोटी ७४ लाख रूपये
१७) आर मध्य विभाग - २ कोटी ५१ लाख रूपये
१८) आर उत्तर विभाग - १ कोटी ८६ लाख रूपये
१९) एल विभाग - २ कोटी २१ लाख रूपये
२०) एम पूर्व विभाग - ५८ लाख ९१ हजार रूपये
२१) एम पश्चिम विभाग - २ कोटी ४६ हजार रूपये
२२) एन विभाग - १ कोटी २६ लाख रूपये
२३) एस विभाग - २९ कोटी ३ लाख ४८ हजार रूपये
२४) टी विभाग - २ कोटी ३७ लाख ६४ हजार रूपये