Mumbai Nagpur Expressway Open Date: विधानसभेपूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्ग मुंबईपर्यंत जोडण्याचा उपाय शोधून काढला आहे. महामार्ग मुंबईपर्यंत जोडण्यासाठी शहापूरमध्ये वाहनांच्या वाहतुकीसाठी दोन पूल तयार केले आहेत. यातील एक पुल जवळपास तयार झाला आहे तर, दुसऱ्या पुलाचे कामदेखील सुरू आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी काही कारणास्तव दुसऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले नाही तर आधीच्या पुलाच्या सहाय्याने एमएसआरडीसी निवडणुकापूर्वीच समृद्धी महामार्ग थेट मुंबईला कनेक्ट करण्याच्या योजनांवर काम करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहापूरमध्ये तयार असलेला एका पूलाला दोन भागांमध्ये विभाजन करुन एमएसआरडीसी संपूर्ण महामार्ग खुला करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई ते नागपूर प्रवास जलद व सुलभ व्हावा यासाठी 701 किमी लांबीचा महामार्ग तयार केला जाणार आहे. आत्तापर्यंत 625 किमी लांबीचा मार्ग वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. आता अंतिम टप्प्यातील इगतपुरी ते ठाणे दरम्यान 76 किमी लांबीचा मार्ग तयार होत आहे. एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतिम टप्प्यातील काम जवळपास 95 टक्के पूर्ण झाले आहे. आता फक्त एका पुलाचे काम सुरू आहे. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी ते ठाणे पर्यंत महामार्गाचे काम हे खूप अव्हानात्मक आहे. 76 किमीच्या या मार्गावर 16 पुल आणि 4 बोगदे आहेत. यातील 15 पूल आणि 4 बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. शाहपुरजवळील एका पुलाचे काम सुरू आहे. हा पुल 82 मीटर म्हणजेच 27 माळ्याच्या इमारती इतका आहे. या पुलाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होऊ शकते. इगतपुरी ते ठाणे दरम्यान एमएसआरडीसीने डोंगऱ्यांच्या मधून बोगदा तयार केला आहे. तसंच, दोन डोंगऱ्यांच्या मध्ये एक पुल तयार करण्यासही अधिक वेळ लागला आहे. 


प्रवासाचा वेळ वाचणार


संपूर्ण महामार्ग खुला झाल्यानंतर मुंबई ते नागपूरपर्यंतचा प्रवास 7 ते 8 तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्याबरोबरच शिर्डी पोहोचण्यासाठी देखील 3-4 तासांचा वेळ लागणार आहे. सध्या शिर्डीला पोहोचण्यासाठी 6-7 तासांचा वेळ लागतो. विधानसभा निवडणुकांपूर्वी महामार्ग पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.