रस्त्यावरील खड्ड्यामुळे बाईकस्वाराचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
रस्त्यावरील खड्ड्यामुळे बाईकस्वाराचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
मुंबई : रस्त्यांवरील खड्ड्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. पावसाळ्यात तर यामुळे मृत्यूमुखी पडण्याचा आकडा वाढत असतो. भिवंडीत रस्त्यांवरील खड्ड्याने पहिला बळी घेतला आहे. सतीश साकरे या ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यामुळे हा अपघात झाला आहे.
पाऊस सुरु झाला आणि जागोजागी रस्त्यांवर खड्डे दिसायला लागले. शिवनाले व्हिलेज रस्त्यावरुन खड्डे वाचवत सतीश साकरे जात होते. मागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. पण खड्ड्यांची समस्या गंभीर असून ती वेळीच सुटणे महत्त्वाचे आहे.
निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधल्यानंतर थोड्याशा पावसात तिथे खड्डे होण्याचा प्रकार वाढतात. ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिली तरीही त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. पण रस्त्याने प्रवास करणाऱ्यांचे हे जीवावर बेतत असते. रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे होतात. त्यात पाणी साचून राहत असल्याने खड्ड्याच्या खोलीचा अंदाज वाहन चालकांना येत नाही. खड्डयात दुचाकीची चाके अडकून राहतात आणि वाहन चालक पडतो. मागून वेगाने येणाऱ्या गाड्यांमुळे वाहनचालकाच्या जीवावर बेतते.