Mumbai-Nashik Expressway Traffic Update  : खड्ड्यांमुळे निर्माण होणारी वाहतुक कोंडीची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी नाशिक-मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणाबरोबरच काँक्रिटीकरणही करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक महापालिकेच्या हद्दीलगतच्या 20 किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची निविदाही जाहीर करण्यात आली. तसेच ठाणे-नाशिक महामार्ग हा महत्त्वाचा आणि रहदारीचा मार्ग आहे. भिवंडी आणि शहापूर शहरात उभ्या राहिलेल्या गोदामांमुळे ठाणे-नाशिक महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. अवजड वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ठाणे-नाशिक, भिवंडी, कल्याण, डोंबिवली येथे जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यावर पर्याय म्हणून मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा उड्डाणपुलाजवळ काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. पुढील दोन महिने हे काम सुरू राहील. या मार्गासह त्याला जोडणाऱ्या ठाणे, भिवंडी आणि मुंब्रा मार्गावर कोंडी होण्याची शक्यता आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-नाशिक महामार्गावरून हजारो वाहने नाशिक, मुंब्रा बाह्यवळण आणि भिवंडीच्या दिशेने वाहतूक करत असतात. भिवंडी, पडघा, नाशिक भागातील गोदामांमुळे या मार्गावर अवजड वाहनांचा मोठा भार आणि त्यात तुलनेत रस्ता अरुंद आहे. भविष्यात समृद्धी महामार्ग या मार्गाला जोडला जाईल. त्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. पूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत होता. परंतु या मार्गाची देखभाल-दुरुस्ती केली जात नव्हती. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी खड्डे पडल्याने वाहतूक मंदगती होऊन वाहनांच्या रांगा लागत होत्या. समृद्धी महामार्गावरील वाहनांचा भार या मार्गावर वाढणार आहे. 


यामुळे हा रस्ता खड्डेमुक्त करण्यासह रुंदीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने 2021 मध्ये हाती घेतले आहे. ठाण्यातील माजिवडा ते पडघा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल. अंतिम टप्प्यातील काम माजिवडा उड्डाणपूल ते साकेत पुलादरम्यान सुरू आहे. येथे रुंदीकरणासह रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामासाठी काही मार्गिकांवर यंत्रणा उभी करण्यात आली आहे. यामुळे साकेत ते माजिवडापर्यंत कोंडी होऊ लागली आहे. पुढील दोन महिने हे काम सुरू राहील. तोपर्यंत ही कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे.


वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल


काँक्रीटीकरणाचे काम र्पू्ण झाल्यानंतर या मार्गिकेवरून वाहतूक सुरू केली जाणार आहे. या कामानंतर सध्या दोन पदरी असलेला मार्ग चार पदरी होईल. यामुळे येथील कोंडीची समस्या कमी होण्याचा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्यांनी केला आहे.