मुंबईकरांनो कबुतरांना दाणे टाकाल तर खबरदार, BMC आकारणार इतका दंड
Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर येतेय. कबुतरांना धान्य टाकल्यास आता मुंबई महानगरपालिका तुमच्यावर कारवाई करु शकते. आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai News: मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने कबुतरे आढळून येतात. मोठ्या चौका-चौकात कबुतरांचा वावर असतो. मात्र, कबुतरांमुळंच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. लोकांमध्ये श्वसनाचे विकार वाढत असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्यामुळं कबुतरांचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. नागरिकांच्या आरोग्यासाठी मुंबई महानगर पालिकेने उपाय काढला आहे. कबुतरांना दाणे टाकणाऱ्या नागरिकांवर मुंबई महानगरपालिका कारवाई करणार आहे.
कबुतरांच्या विष्ठा आणि पंखांमधून निघणारे घटक आरोग्यास अपायकारक असल्याचं अनेक संशोधनातून सिद्ध झालं आहे. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस बुरशी आढळून येते. यामुळे अलर्जी होऊ शकते. तसंच, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांना फुफ्फुसात संसर्ग होतो. यावर उपाय म्हणूनच कबुतरांना दाणे, धान्य टाकणाऱ्यांवर मुंबई महापालिकेच्या क्लीन-अप मार्शलची नजर असणार आहे. दाणे टाकताना आढळल्यास १०० ते ५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.
मुंबईत भुलेश्वर, दादर, माहिम, फोर्ट, माटुंगा या ठिकाणी गेल्या कित्येत वर्षांपासून कबुतरखाने आहेत. इथे अनेक नागरिकांकडून चणे, गहू, तांदूळ, डाळ असे खाद्य कबुतरांना घालण्यात येते. मुंबईत ठिकठिकाणचे कबुतरखाने आणि सोसायट्यांच्या, धान्य विक्री दुकानांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कबुतरे संख्या वाढल्याने त्रास वाढला आहे. त्यामुळंच महापालिकेने तातडीने यावर उपाय आखत कारवाईचा निर्णय घेतला आहे.
पक्षीप्रेमी आणि धार्मिक कारणाने कबुतरांना दाणे टाकले जातात. खाण्यासाठी आयते धान्य मिळत असल्याने मुंबईत मागील काही वर्षांपासून कबुतरांची संख्या प्रचंड आहे. पण त्यामुळं वृद्ध, लहान मुलं आणि रुग्णांमध्ये श्वसनाचा त्रास वाढत जातात. त्यामुळं मुंबई महानगर पालिका प्रत्येक विभागांत क्लीन अप मार्शल नेमणार असून कबुतरांना धान्य टाकणारा व्यक्ती आढळलास त्यांच्याकडून 100 ते 500 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.
कबुतरांमुळं होणारे आजार
- हायइनायटिस
- सायनसायटिस
- हायपर सेन्सेटिव्ह न्यूमोनिया
- क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज
- (श्वसनमार्गाचा गंभीर आजार)
- अन्य गंभीर त्रास
- त्वचेची अॅलर्जी
- फंगल इन्फेक्शन
- डोळे लाल होणे
- श्वासनलिकेला सूज
- फुफ्फुसांना सूज