Python Found Behind Fridge In Mumbai: घरात तुम्ही निवांत पहुडलले असतात इतक्यात स्वयंपाकघरातून आवाज येतो. घरात मांजर किंवा पक्षी शिरला असेल या भ्रमात तुम्ही किचनमध्ये जाता आणि समोरचे दृश्य पाहून पायाखालची जमिनच हादरते. तुमच्या समोर अवघ्या काही फुटांवर महाकाय अजगर वेढा घालून बसलेला असतो. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा प्रसंग मुंबईतील धारावीत घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारावी येथे राहणाऱ्या रुकसाना शेख यांच्या घरात 11 फूट आणि 14 किलो वजन असलेला इंडियन रॉक पायथॉन सापडला आहे. अजगराने नुकताच एका सश्याचा फडसा पाडला होता व सुस्तपणे रुकसाना यांच्या घरात लपला होता. रुकसाना यांनी म्हटलं आहे की, त्यांच्या मध्यरात्री ३च्या आसपास मुलाला फ्रिजच्या मागून आवाज येत होता. आवाज कसला येतो हे पाहण्यासाठी तो हातात टॉर्च घेऊन किचनमध्ये गेला. फ्रिजच्या मागे जाऊन पाहताच त्याला महाकाय अजगर दिसला. 


घरात अजगर पाहताच मुलाने आरडाओरडा करायला सुरुवात केली. मध्यरात्री घरात साप आढळल्याने एकच खळबळ माजली. शेख यांच्या घरात दोन ससे होते. त्यातील एक ससा गायब होता. अजगरानेच त्याची शिकार केल्याचे नंतर समोर आले. भल्या मोठ्या अजगराला पाहून कुटुंबीयांची भितीने गाळणच उडाली होती. कुटुंबीयांनी सर्पमित्राला बोलावले त्यानंतर त्यांची या कठिण परिस्थितीतून सुटका झाली. 


वाइल्ड लाइफ अॅनिमल प्रोटेक्शन अँड रेस्कू असोसिएशन (अतुल कांबळे) यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या घरात अजगर सापडला त्याच्या बाजूलाच मीठी नदी वाहते. त्यामुळं घरात सहज अजगर घुसू शकला. या अजगराला पकडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे, असं सर्पमित्रांनी सांगितलं आहे. 


अजगर आक्रमक होता तो आधीपासूनच हल्ल्याच्या तयारीत होता. कारण त्याने तेव्हाच त्याची शिकार फस्त केली होती. त्यामुळं त्याला पकडणे आव्हानात्मक होते. कारण कधीही हल्ला करु शकत होता. मोठ्या मुश्कीलीने त्याच्यावर नियंत्रण ठेवत त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. 


घरात दहशतीचे वातावरण


शनिवारी संध्याकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अजगराला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. मात्र, ज्या घरात अजगर आढळला होता तिथे अजूनही भितीचे वातावरण आहे. रुकसान शेख यांच्याबरोबरच त्यांची मुलंही घाबरले आहेत. मध्यरात्रीच साप आढळल्याने त्यांची पूर्ण झोपच उडाली आहे. इतकंच काय तर मुलांनी घरात येण्यासही नकार दिला आहे. ते शाळेतही गेले नाहीयेत.