Mumbai AC Local:  लोकल ही मुंबईची लाइफलाइन समजली जाते. सकाळी चाकरमान्यांची ऑफिसला जाण्याची गडबड असते. सकाळच्या गर्दीच्या वेळात एसी लोकलवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली ते डोंबिवलीदरम्यानची घटना असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते सीएसएमटी एसी लोकलवर ही दगडफेक करण्यात आली आहे. सकाळी 8.33 च्या सुमारास ठाकुर्ली ते टिटवाळादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने एसी लोकलवर मोठा दगड फिरकावल्याचे समोर आले आहे. यात एसी लोकलच्या काचा फुटल्या असून मोठे नुकसान झाले आहे. 


एका प्रवाशाने एसी लोकलवर झालेल्या दगडफेकीचे काही फोटो आणि व्हिडिओ ट्विट केले आहेत. त्याचबरोबर आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मध्य रेल्वेकडे केली आहे. दरम्यान, या व्यक्तीच्या ट्विटवर मध्य रेल्वेने रिप्लाय करत या प्रकरणी अधिक चौकशी करत आहोत, असं म्हटलं आहे. 



दगडफेकीच्या घटनेनंतर काही वेळ ट्रेन थांबवण्यात आली होती. एका माथेफिरुने लोकलवर दगडफेक केल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. आरोपीची अधिक चौकशी सुरू आहे. या घटनेमुळं काही वेळ लोकल विस्कळीत झाली होती. मात्र, नंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. 


व्हिडिओत दिसत आहे की, लोकलच्या काचा फुटल्या असून बाजूला काही महिला उभ्या आहेत. तर, लोकलच्या आत बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर इजा झाली नाहीये. मात्र अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुन्हा एकदा लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


दरम्यान, मागील महिन्यातही अशीच एक घटना समोर आली होती पश्चिम रेल्वेवरील कांदिवली स्थानकात एसी लोकलवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. घरात बायकोशी झालेल्या भांडणातून एका व्यक्तीने एसी लोकलवर दगडफेक केली होती. या घटनेनंतर आरपीएफ प्रवाशांनी त्याला ताब्यात घेतले होते. मात्र, आता पुन्हा महिन्याभरानंतर मध्य रेल्वेवर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.