Mumbai Local News Update: पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) प्रवाशांचा प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. 15 ऑगस्टपासून प्रवाशांची जीवघेण्या गर्दीतून सुटका होणार आहे. रेल्वे प्रशासनाने एख महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता लोकलच्या 49 फेऱ्या 12 ऐवजी 15 डब्ब्यांच्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता प्रवाशांचा प्रवास थोडा सुखाचा होणार आहे. (Mumbai Local Train Update)


पश्चिम रेल्वेवर फेऱ्या वाढवल्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे प्रशासनाने पश्चिम रेल्वेवर 49 फेऱ्या या 12 ऐवजी 15 डब्यांच्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.यातील सर्वाधिक 19 फेऱ्या अंधेरी-विरार स्थानकादरम्यान धावणार आहेत. वाढीव फेऱ्यांमुळं पश्चिम रेल्वेवरील 15 डब्यांच्या एकूण लोकलफेऱ्यांची संख्या 199 पर्यंत पोहोचली आहे. 15 डब्यांच्या लोकलमध्ये प्रवासी क्षमता ही 12 डब्यांच्या लोकलच्या तुलनेत 25 टक्के अधीक असते. त्यामुळं लोकलच्या गर्दीत थोड्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. चर्चगेट ते विरारदरम्यान प्रवास करणाऱ्यांना याचा अधिक फायदा होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे. 


विरारकरांना मिळणार दिलासा


वसई, विरार, नालासोपारा येथून चर्चगेटकडे येणाऱ्या नोकरदारांना सकाळच्या वेळी गर्दीमुळं नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळं पश्चिम रेल्वेवर लोकलची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी सतत होत होती. दरम्यान पश्चिम रेल्वेवर आजपासून 15 डब्यांच्या आणखी ४९ लोकलफेऱ्या वाढणार आहेत. 12 डब्यांच्या लोकलमधून 2,400 तर 15 डब्यांच्या लोकलमधून तीन हजार प्रवासी वाहतूक दररोज होते. 


अशा असतील १५ डब्यांच्या वाढीव फेऱ्या (अप/डाऊन)


अंधेरी-विरार - १९


विरार-बोरिवली - ११


अंधेरी-वसई रोड- ७


बोरिवली-नालासोपारा - २


दादर-विरार - ४


चर्चगेट-विरार - २


बोरिवली-वसई रोड -१


अंधेरी-भाईंदर - १


नालासोपारा-अंधेरी - १


भाईंदर-विरार - १