Crime News: मुंबईमधील टिळकनगर पोलिसांनी (Tilak Nagar Police) एका जोडप्याला अटक केली आहे. हे जोडपं उत्तर प्रदेशातील (Uttar Pradehs) आजमगढ (Azamgarh) येथून आलं होतं. हे जोडपं एका 18 वर्षाच्या मुलीला विकण्याच्या हेतूने मुंबईत घेऊन आलं होतं. कुंटणखान्यात (Red Light Area) नेऊन या मुलीला विकण्याची त्यांची योजना होती. पण त्याआधीच एका रिक्षाचालकाने प्रसंगावधान दाखवल्याने ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांना या जोडप्याला अटक केली असून, मुलीची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे. तसंच तिच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातून मानवी तस्करी करत मुलीला मुंबईत विकण्यासाठी आलेल्या जोडप्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. टिळक नगर पोलिसांनी ही कारवाई केली असून, या जोडप्याने याआधी किती मुलींना विकलं आहे याची माहिती घेत आहेत. आंचल शर्मा (20) आणि अमन शर्मा (21) असं या जोडप्याचं नाव आहे. दोघेही उत्तर प्रदेशच्या आजमगढमधील खालिसपूर गावाचे रहिवासी आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास एक वर्षांपूर्वी अमन शर्माची मुलीशी भेट झाली होती. यावेळी त्याने मुलीला आपण अविवाहित असल्याची खोटी बतावणी केली होती. त्याने लग्नाचं खोटं अमिष देत मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. जवळपास एक वर्ष त्याने तिच्याशी प्रेमाचं खोटं नाटक केलं. यानंतर त्याने तिला घऱातून पळून जाऊन लग्न करण्याचं आमिष दाखवलं. मुलगी त्याच्या बोलण्यावर भाळली होती. अखेर 18 मे रोजी मुलगी त्याच्यासोबत मुंबईसाठी निघाली होती. 


बायकोची वहिनी म्हणून करुन दिली ओळख


अमन शर्माने मुंबईला जाताना आंचल शर्मालाही सोबत नेलं होतं. जेव्हा मुलीने ट्रेनमध्ये आंचलला पाहिलं तेव्हा तिने अमनकडे ही कोण आहे? अशी विचारणा केली. त्यावर अमनने ही आपली वहिनी असून आशिर्वाद देण्यासाठी सोबत येत असल्याचं सांगितलं. अशाप्रकारे अमन आणि आंचल मुलीला घेऊन 20 मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर पोहोचले होते. 


रिक्षाचालकाकडे केली कुंटणखान्याची विचारणा


लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर पोहोचल्यानंतर, अमनने दोघींनी फ्रेश व्हा, मी थोड्या वेळात येतो असं सांगितलं. यानंतर तो बाहेर गेला आणि रिक्षाचालकाला जवळपास कुंटणखाना कुठे आहे ? अशी विचारणा केली. तसंच आपल्याला 40 हजारात एका मुलीला विकायचं आहे असंही सांगितलं. हे ऐकताच रिक्षाचालकाने संधी मिळाल्यानंतर टिळकनगर पोलिसांशी संपर्क साधत संपूर्ण प्रकार सांगितला. 


यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विलास राठोड यांनी उप-पोलीस निरीक्षक बबन हरल यांना घटनास्थळी पाठवलं. बबन हरल तिघांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले आणि चौकशी केली. यावेळी त्यांना संपूर्ण घटनाक्रम लक्षात आला आणि गुन्हा उडडकीस आला. 


मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात अपहरण आणि मानवी तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती झोन-6 चे डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी दिली आहे.