योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : काही दिवसांपूर्वी रायगडच्या अलिबाग तालुक्‍यातील वरसोली समुद्र किनाऱ्यावर 'स्वच्छता हीच सेवा' उपक्रम राबवत असताना चरसची पाकिटं (Drugs Seized) आढळून आली होती. त्यामुळे ड्रग्ज विरोधी कारवाईसाठी पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई केली आहे. नाशिकच्या शिंदे पळस्पे भागात मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थांचा कारखाना उध्वस्त करण्यात आलाय. या कारवाईत कोट्यावधी रुपयाचे ड्रग्ज सापडले आहेत. नाशिकच्या श्री गणेशाय इंडस्ट्रीज या कंपनीत ड्रग्ज निर्मिती सुरु होती. नाशिक शहरात ड्रग्ज माफियांचा जो काही सुळसुळाट आहे किंवा तरुणाई या ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे त्याला ही कंपनी कारणीभूत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्चर्याची बाब म्हणजे अमली पदार्थांचा हा कारखाना नाशिक पोलिसांच्या हद्दीत येतो. परंतु नाशिक पोलिसांना याचा  मागमूस नव्हता. नाशिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून ड्रग्ज निर्मिती करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कारवाईनंतर नाशिक पोलिसांची एकच धांदल उडाल्याचं पाहायला मिळतयं. या प्रकरणात कंपनी मालकासह कामगारांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबईच्या साकीनाका पोलिसांची नाशिकमध्ये तब्बल तीन दिवस कारवाई सुरू होती. मुंबई पोलिसांच्या या कारवाईला अखेरीस यश आलं आहे.


या छापेमारीत दीडशे किलोहून अधिक किलो एमडी ड्रग्ज मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहे.आतापर्यंत मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवायांपैकी ही एक महत्वाची कारवाई म्हणावी लागेल. एकंदरीत या प्रकरणानंतर राज्यातील ड्रग्जचं मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या राज्यात पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील अंमली पदार्थाचे जाळे शोधून उद्ध्वस्त करणे, हा पोलिसांचा हेतू आहे. 


पुण्यातील ससून रुग्णालायाच्या गेटवर ड्रग्ज सापडल्याचं प्रकरण ताजं असताना ड्रग्ज माफिया ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातुन पोलिसांच्या हाती तुरी देऊन फरार झाला होता. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेश द्वाराजवळ रविवारी अंमली पदार्थ सापडले होते. ड्रग्ज रॅकेट चालवणारा ललित पाटील आता पोलिसांच्या ताब्यातून निसटला होता. नाशिकचा रहिवासी असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा पोलीस सातत्याने शोध घेत आहेत.


ललित पाटील याचा पासपोर्ट पुणे पोलिसांकडून ताब्यात


ड्रग माफिया ललित पाटीलने पुणे पोलिसांच्या हातावर तुरी दिल्यानंतर त्याला शोधण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडत आहेत. पुणे पोलिसांनी उपनगर परिसरातील त्याच्या घरामध्ये घर झडती घेत त्याची सर्व कागदपत्र जप्त केली आहेत. यामध्ये त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे जेणेकरून ललित पाटील कुठल्याही परदेशामध्ये फरार होऊ नये.


दरम्यान, नाशिक शहरात सध्या अमली पदार्थ पान टपऱ्या हॉटेल्स विविध ठिकाणी खुलेपणे विकले जात आहेत. एमडी ड्रग एका चिमटीला पाचशे रुपये अशा किमतीला विकले जात असून बुक, सेशनच्या नावाने विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. चांगला अभ्यास होतो असे सांगून विद्यार्थ्यांना या नशेच्या आहारी लोटले जात आहे. यातूनच गुन्हेगारांचा जन्म होतो आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील ललित पाटील आणि भूषण पाटील हे दोन्ही भाऊ यामध्ये अडकले आहेत.