मुंबई : Coronavirus  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता या विषाणूच्या प्रादुर्भावाची क्षमता आणि रुग्णसंख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील बहुतांश भागांची विभागणी ही रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये १४ रेड झोन, १६ ऑरेंज झोन आणि ६ ग्रीन झोनचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावी क्षेत्र म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात आहे. जिथे कोरोना रुग्णांचा अकरा हजारांच्याही पलीकडे गेला आहे. कोरोनाच्या या विळख्यात महाराष्ट्रात मृतांचा आकडाही ४८५ पलीकडे गेला आहे. यामध्ये जवळपास १८७९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. महाराष्ट्रामागोमाग देशात गुजरातमध्ये कोरोनाची दहशत पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ४७२१ कोरोना रुग्ण आढळले आहेत.


दरम्यान, साऱ्या देशाला विळखा घालू पाहणाऱ्या या विषाणूमुळे मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, पुणे, बंगळुरू आणि अहमदाबाद या क्षेत्रांना केंद्राकडून कोरोनासाठीच्या रेड झोन जाहीर करण्यात आलं आहे. जिल्हानिहाय रुग्णसंख्येवर ही विभागणी करण्यात आली आहे. 


महाराष्ट्रातील ही विभागणी खालीलप्रमाणे : 


रेड झोन- मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर 


ऑरेंज झोन- रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड, वर्धा 


ग्रीन झोन- उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा 


शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जवळपास ७३३ जिल्ह्यांची विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये करण्यात आली. देश पातळीवर ही संख्या पाहिली असता १३० रेड झोन, २८४ ऑरेंज झोन आणि ३१९ ग्रीन झोन असल्याचं स्पष्ट होत आहे. याव्यतिरिक्त २०७ जिल्हे नॉन हॉटस्पॉट झोन असल्याचं सांगण्यात आलं आहे. 



 


कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन हा आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. परिणामी आता लॉकडाऊनचा हा कालावधी १७ मे पर्यंत लागू असणार आहे. यादरम्यान कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरु होणार नसल्याचं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.