देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर कर्जत दरम्यान तांत्रिक काम करण्यात येणार असल्याने  रेल्वे प्रशासनाने ३० नोव्हेंबर, २०१९ पर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळामार्फत नियमित फेऱ्या व्यतिरिक्त मुंबई -पुणे, ठाणे-पुणे मार्गावर ७० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवनेरी बस वाहतुकीचे मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर सरासरी २७८ (जाता -  येता ) फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. तसेच ३६ निमआराम वाहतुकीच्या फेऱ्या मुंबई-पुणे मार्गावर सुरु आहेत. याबरोबरच मुंबई, परळ, कुर्ला येथून पुणे मार्गे जाणाऱ्या २९० फेऱ्या उपलब्ध आहेत.  म्हणजेच पुणे मार्गावर जाण्यासाठी दररोज  ४६५ फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत.



या व्यतिरिक्त प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या बसेसच्या  ठाणे विभागाने - २०, मुंबई विभागाने- १५, पुणे विभागाने- १५, शिवनेरी बससेवेच्या - २० अशा ७० जादा  फेऱ्यांचे दररोज नियोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त आवश्यकता भासल्यास प्रवाश्याच्या गर्दीनुसार जादा बसेस  सोडण्यात येणार आहेत.