महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या ९ गरोदर महिलांची सुखरूप सुटका
बदलापूर येथे पुराच्या पाण्यात पसलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांमध्ये ९ गरोदर महिला होत्या.
मुंबई : बदलापूर येथे पुराच्या पाण्यात पसलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांमध्ये ९ गरोदर महिला होत्या. यापैकी एका महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच त्या महिलेच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी मागणी केली होती. त्यानंतर त्यांना त्वरीत मदत देत सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल्याची माहिती, मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बचाव कार्यात मदत केलेल्या सर्व बचाव पथकांचे ट्विटरवरून सर्वांचे आभार मानले.
२६ जुलैच्या पावसाने हजारभर प्रवाशांना अक्षरशः यातना सोसाव्या लागल्या. बदलापूरजवळच्या वांगणीमध्ये मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस रुळावरून वाहणाऱ्या पुरामुळे अडकली आणि तब्बल १७ तास प्रवाशांनी जीव मुठीत धरून यातना सहन केल्या. या घटनेने प्रशासनाची उदासिनता आणि आपत्ती व्यवस्थापनाचा फोलपणा उघड झाला. दरम्यान, यशस्वी बचावकार्य पार पाडत फसलेल्या ९ गरोदर महिलांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले.
चारही बाजूने पुराच्या पाण्यात वेढलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस. उल्हासनदीचे पाणी डब्यात कधीही शिरेल अशी स्थिती. आणि जीव मुठीत धरून बसलेले एक हजार पन्नास प्रवासी. प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही अशा अवस्थेत तब्बल १७ तास हे प्रवासी जीव मुठीत धरून बसले होते. खरं तर जेव्हा काल पाण्याने भरलेल्या रेल्वे स्थानकातून महालक्ष्मी एक्स्प्रेस पाणी उडवत गेली होती. तेव्हाच प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता. याबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली