मुंबई : राज्यात जवळपास सर्व भागात पावसाचा जोर वाढलेला दिसून आला आहे. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पहायला मिळाला. मुंबईत पावसाचा जोर पाहता एक महत्वाची बातमी समोर आलीये. गेल्या चार दिवसांपासून  राज्यात पाऊस सक्रीय झाला असला तरी जोर मात्र, मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणावरच कायम आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून राज्यात जवळपास चारही विभागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

8 जुलै म्हणजे आज मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच या शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलंय. आतापर्यंत मुंबई आणि ठाणे पर्यंत मर्यादित असलेला पावसाने आता पालघरलाही घेरलंय. त्यामुळे या तीन शहरांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय. 


मुंबईसह आजूबाजूचे जिल्हे ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत होता. त्यामुळे हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.


दरम्यान रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी फक्त सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असणार आहे. यानंतर समुद्रकिनारी कुणीही फिरू नये, अशी सूचना महापालिका प्रशासनानं दिली आहे. 


राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सक्रीय झाला आहेच. पण पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस हे राज्यात पावसाचेच राहणार आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघरसह मध्य महाराष्ट्रातील नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.