Mumbai Heavy Rain Updates: राज्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. पावसामुळं अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांनी धोक्याची पातळ ओलांडल्याने गावात व शहरात पुराचे पाणी शिरले आहे. पुणे, रायगड, कोल्हापुरनंतर कल्याणमध्येही पावसाने धुमाकुळ घातला आहे. उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर कल्याण नगर मार्गावरील कल्याणच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणमध्ये कालरात्रीपासून पाऊस कोसळत आहे. पावसामुळं शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. त्याचबरोबर, ग्रामीण भागातून वाहणारया उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला तर कल्याण नगर महामार्गावरील रायते पुलाला देखील पाणी लागलं आहे. 


पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीचे पाणी पुलावरून वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव या रायते पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहन चालकांना टिटवाळा गोवेली मार्गे कल्याण गाठण्याचा आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. उल्हास नदीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उल्हास नदीने रौद्र रुप धारण केले आहे. नदीचे हे रूप धडकी भरवणारे आहे. 


कल्याण डोंबिवली आजूबाजूच्या परिसरात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे कल्याण डोंबिवली मधील सखल भागातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं होतं. मध्यरात्रीच्या सुमारास पावसाचा जोर वाढला मात्र पहाटे पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. मात्र सकाळपासून पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीत जोरदार पावसाने सुरुवात केली. पावसाचा जोर आजही कायम राहिल्यास कल्याण डोंबिवली सहा आजूबाजूच्या भागातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. 



कल्याण स्थानकपरिसरात पाणी साचले 


सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण स्टेशन परिसरात पाणी साचले आहे. कल्याणच्या स्टेशन रोड व कपोते वाहन दरम्यान रस्त्यावरती पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.