रत्नागिरी : अत्याधुनिक सुविधानी सुसज्ज अशी वातानुकूलीत 'शिवशाही' बस शनिवारपासून मुंबई सेंट्रल ते रत्नागिरी मार्गावर धावणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिवहन व खारभूमी विकास मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून 'शिवशाही' साकारण्यात आलीय. कोकण आणि एस. टी. ह्यांचे एक अतूट नाते आहे. तसंच कोकणातील चाकरमान्यांचा एस. टी. म्हणजे जिव्हाळ्याचा विषय! म्हणूनच एस. टी. महामंडळाने ही गाडी सुरु करण्याचा बहुमान हा रत्नागिरीकरांना दिला आहे.


या बसमध्ये एकूण ४५ पुशबॅक आसने असून ही संपूर्ण बस वातानुकुलीत आहे. प्रत्येक सीटला ह्यात व्यकितिगत मनोरंजनासाठी एल. सी. डी. स्क्रीन दिली असून ह्याद्वारे प्रवाशांचे मनोरंजन होणार आहे. सोबतच हेडफोन्सद्वारे एफ. एम. ऐकण्याची सुविधादेखील उपलब्ध असणार आहे. अशा प्रकारचे नाविन्य घेऊन आलेली ही बस म्हणजे एसटीच्या शिरपेचात खोवलेला एक तुरा आहे.


असा असेल मार्ग...


मुंबई सेंट्रल - दादर - कुर्ला नेहरू नगर - पनवेल - रामवाडी - माणगांव - महाड - भरणा नाका - चिपळूण - संगमेश्वर  - रत्नागिरी असा या बसचा मार्ग असेल.


मुंबईहून रात्री ९.४५ वाजता निघालेली ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता रत्नागिरीला पोहचेल. तर रत्नागिरीहून रात्री १० वाजता निघालेली गाडी मुंबईला दुसऱ्या दिवशी सकाळी  ७ वाजता पोहचेल.


असे असतील तिकीट दर


मुंबई ते रत्नागिरी : रु. ५५६


मुंबई ते संगमेश्वर : रु. ४८३


मुंबई ते चिपळूण : रु. ४२०