Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुल लवकरच नागरिकांसाठी खुला होतोय. शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प हा 23 किमी लांबीचा असून या प्रकल्पामुळं मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हा बहूप्रतीक्षीत पूल 25 डिसेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता मात्रा आता हा मुहूर्तदेखील हुकणार असून जानेवारीपर्यंत सर्वसामान्यांसाठी हा पूल खुला होण्याची शक्यता आहे. या पुलावरुन प्रवास करण्यासाठी नागरिकांना किती टोल द्यावा लागणार याबाबत एक नवीन माहिती समोर येतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन प्रवास करण्यासाठी नागरिकांना 500 रुपयांपर्यंत टोल आकारला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. MTHL प्रकल्प शेवटच्या टप्प्यात असताना प्रकल्प पूर्ण करण्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) 22 किमी सागरी मार्गासाठी एकेरी टोल म्हणून 500 रुपयांचा टोल प्रस्तावित केला आहे, तर राज्य सरकारकडून 350 रुपये टोल आकारण्यात यावा, असा सल्ला देण्यात आला आहे. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. 


MMRDAला वांद्रे-वरळी सीलिंकप्रमाणेच टोलची आकारणी करायची आहे. मात्र, राज्य रस्ते विकास महामंडळाने सी-लिंक उभारला आहे, यासाठी 4.2 किमी लांबीच्या पूलासाठी महामंडळ 85 रुपयांचा एकेरी टोल आकारत आहे.  एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाची वास्तविक किंमत, प्रकल्पाची लांबी, वाहनांची तीव्रता आणि सवलतीचा कालावधी यावरुन टोल टॅक्सची गणना केली जाते. एमटीएचएलच्या सविस्तर प्रकल्प अहवालात नगरविकास खात्याने ५०० रुपयांचा टोल कसा लावला याचे विशिष्ट तपशील आहेत. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत टोल 40 ते 50 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे, असं अधिकाऱ्याने नमूद केलं आहे.


दरम्यान,मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे उद्घाटन अटलबिहारी वाजपेयी जयंतीच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार अशी माहिती होती. मात्र, तूर्तास तरी हे शक्य नसल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतेय. पुलाचे संपूर्ण काम जानेवारी 31 पर्यंत पूर्ण होईल त्यानंतर पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असं एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. “एमएमआर क्षेत्रात सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांमुळे कामगारांची 30% कमतरता आहे. आम्ही कामगारांना आता तिन्ही शिफ्टमध्ये काम करण्यास सांगितले आहे, असंहीअधिकाऱ्याने सांगितले आहे.


मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळं मुंबईतील वाहतुक कोंडी फुटणार आहे. यापुलामुळं मुंबई ते नवी मुंबई प्रवास अवघ्या 10 ते 15 मिनिटांवर येणार आहे. तसंच, मुंबई ते पुणे अंतर 90 मिनिटांत गाठता येणार आहे.