मुंबई विद्यापीठाच्या 22 जानेवारीला होणाऱ्या 14 परीक्षा पुढे ढकलल्या
Mumbai University : 22 जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या दिनांक 22 जानेवारीला होणाऱ्या एकूण 14 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा दिनांक 31 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून याची माहिती देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या 14 परीक्षा
दिनांक 22 जानेवारी रोजी पुढे ढकलण्यात आलेल्या सकाळच्या सत्रातील परीक्षांमध्ये बी.कॉम. सत्र 5 , एमए पब्लिक पॉलिसी सत्र 3, एमए राज्यशास्त्र सत्र 1, एमएस्सी रिसर्च सत्र 1 या चार परीक्षांचा समावेश आहे.
तर दुपारच्या सत्रात बीएमएस - एमबीए ( 5 वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र 1, तृतीय वर्ष बीए सत्र 5, प्रथम वर्ष एलएलबी - जन. एलएलबी ( 3 वर्षीय अभ्यासक्रम ) सत्र 1, प्रथम वर्ष एलएलबी - बीएलएस ( ५ वर्षीय अभ्यासक्रम ) सत्र 1, एलएलबी ( 3 वर्षीय अभ्यासक्रम, 75:25) सत्र 1,
बीए एलएलबी ( 5 वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम, 75:25) सत्र 1, प्रथम वर्ष एलएलबी - जन. एलएलबी ( 3 वर्षीय अभ्यासक्रम, 60:40 ) सत्र 1, प्रथम वर्ष एलएलबी - बीएलएस ( 5 वर्षीय अभ्यासक्रम, 60:40) सत्र 1, एमएसडब्ल्यू सत्र 3, एमएस्सी रिसर्च सत्र 3 या 10 परीक्षांचा समावेश आहे.
या 14 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांची सुधारित तारीख दिनांक 31 जानेवारी देण्यात आली आहे.
आयडॉलच्या 3 परीक्षा पुढे ढकलल्या
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या 3 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यातील प्रथम वर्ष बीए सत्र 1 व प्रथम वर्ष बीकॉम सत्र 1 या परीक्षा 22 जानेवारी ऐवजी 6 फेब्रुवारीरोजी व एमएमएस सत्र 2 ची परीक्षा 22 जानेवारी ऐवजी 1 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे.