मुंबई विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांसंदर्भात महत्त्वाची Update; विद्यार्थ्यांनो लक्षपूर्वक वाचा
महाविद्यालयाच्या प्रवेश अर्जासह मुंबई विद्यापीठाची ऑनलाईन नावनोंदणीही बंधनकारक असणार आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यापीठाकडून आवाहन करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी पदवीच्या 3 आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या वेळी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करण्यास सांगितले आहे. काही विद्यार्थी महाविद्यालयांचे ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज भरतात पण नावनोंदणी करण्याकडे मात्र दुर्लक्षित करतात.
https://muugadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर अर्ज करणेही बंधनकारक आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत पारित झालेल्या ठरावानुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया ही ई समर्थ संकेतस्थळावर सुरू झालेली आहे.
संकेतस्थळावर नावनोंदणी करणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असणार आहे. तसेच ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. त्या महाविद्यालयांचे ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज भरणेही बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ही प्रत्येक महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावर जाहीर करावी. याबाबत महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिली. विद्यार्थ्यांना https://muugadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर 10 जून रोजी दुपारी 1वाजेपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे. त्यानंतर 13 जून रोजी सायंकाळी 5 वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल.