Mumbai University:  विद्यार्थ्यांची कागदपत्रे वेळेत विद्यापीठापर्यंत पोहोचली नाहीत, तर भविष्यात विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानास संबंधित महाविद्यालय जबाबदार असेल, अशा इशारा मुंबई विद्यापीठाने दिला आहे. हे सांगताना मुंबई विद्यापीठाकडून महाविद्यालयांची यादीच जाहीर केली आहे. काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विद्यापीठाने काही महाविद्यालयांना इशारा दिला आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांच्या पात्रता आणि नावनोंदणी संबंधातील आवश्यक कागदपत्रे 8 दिवसात विहित शूल्कासह विद्यापीठाकडे जमा करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठामार्फत करण्यात आले होते. ही मुदत संपल्यानंतर विद्यापीठाने ज्या महाविद्यालयांनी विहित मूदतीत प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे सादर केली नाहीत अशा महाविद्यालयांची यादी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. 


या यादीमध्ये शैक्षणिक वर्ष 2019-20 ते 2022-23 अशा चार वर्षात ज्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे सादर केली नाहीत अशा महाविद्यालयांचा समावेश आहे. या सर्व महाविद्यालयांना पुन्हा एकदा 1 महिन्याची मूदत देण्यात आली आहे. सदर मूदतीत जी महाविद्यालये प्रवेश प्रक्रिये संदर्भात आवश्यक कागदपत्रे शुल्कासह विद्यापीठाकडे सादर करणार नाहीत अशा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जाणार असून अश्या महाविद्यालयांना पुढील शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास परवानगी नाकारण्यात येणार असून याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची असणार असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.


मुंबई विद्यापीठामार्फत प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांना प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे विहित मुदतीत जमा करण्यासाठी परिपत्रानुसार सर्व संलग्नित महाविद्यालयांना कळविण्यात येते. प्रथम वर्षात प्रवेश घेतल्यानंतर त्याची नाव नोंदणी व पात्रता बाबतचे दस्तऐवज त्याच वर्षात जमा करणे आवश्यक असतानाही अनेक महाविद्यालयांमार्फत विहित मुदतीत कागदपत्रे सादर केली जात नाहीत. शैक्षणिक वर्ष 2019-20, 2020-21,2021-22 आणि 2022-23 या वर्षात विविध अभ्यासक्रमांना प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे पात्रतेसंबंधीत अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. 


अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विद्यापीठामार्फत सुरुवातीला 15 फेब्रुवारी 2024 या तारखेपर्यंत विहित शूल्कासह कागदपत्रे जमा करण्यासाठी कळविण्यात आले होते. त्यानंतर 30 सप्टेंबर 2024 ही मुदतवाढ देण्यात आली होती. 30 सप्टेंबर 2024 ही शूल्कासह कागदपत्रे जमा करण्याची अंतिम मूदत उलटूनही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील कागदपत्रे अद्याप विद्यापीठाकडे जमा केलेली नाहीत. 


दिलेल्या मुदतीत जमा न केलेल्या कागदपत्रांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले जातात, पर्यायाने पुढील शिक्षण आणि नोकरीच्या संधीमध्ये संभाव्य बाधा निर्माण होत असतात. त्यामुळे व्यापक विद्यार्थी हित लक्षात घेता विद्यापीठामार्फत 8 दिवसाची मूदतवाढ देण्यात आली होती.  


वर्षनिहाय आकडेवारी


2019-20 -- 14,442


2020-21-- 12,281


2021-22-- 22,900


2022-23--47,610