Mumbai Air Pollution : विषय गंभीर; फटाक्यांमुळं वाढलं मुंबईतील प्रदूषण, परिणाम पाहून वाढेल चिंता
Mumbai Air Pollution : फटाक्यांमुळे मुंबईच्या हवेतील प्रदुषणाची पातळी वाढली...
Mumbai Air Pollution : सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी दिवाळी सुरु झाली असली तरी त्याच्या तयारीला सगळे बऱ्याच काळापासून लागले होते. दिवाळीसाठी फराळ बनवण्यापासून नवीन कपडे खरेदी करण्यापर्यंत सगळ्यांची तयारी चांगलीच सुरु होती. दिवाळी आणि फटाके जणू हे एकच समिकरण आहे. फटाक्यांशिवाय दिवाळी ही अपूर्ण आहे असं अनेकदा लोकांना बोलताना आपण ऐकतो. पण त्यामुळे मुंबईच्या प्रदुषणात किती वाढ झाली आहे याची माहिती समोर आली आहे.
हवेच्या गुणवत्तेची धोकादायक पातळी
मुंबईच्या प्रदुषणात वाढ झाली असून हवेची गुणवत्ता ही 174 AQI नोंदवण्यात आली आहे. तर हवेची गुणवत्ता जर 174 AQI असेल तर हे असमाधान कारक आहे. दरम्यान, आपल्या हृदयासाठी जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे पीएम 2.5 आणि पीएम 10 याची गुणवत्ता देखील काही ठिकाणी धोकादायक पातळी म्हणजेच 500 पर्यंत पोहोचली आहे. मुंबईत गुरुवारी खूप फटाके फोडण्यात आले, त्यामुळेच शुक्रवारी सकाळी मुंबईच्या हवेत धूर दिसून आला. केंद्रिय प्रदुषण नियंत्रन मंडळ (सीपीसीबी) आणि बीएमसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईची सरासरी हवेची गुणवत्ता आता असमाधानकारक आहे.
सीपीसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सगळ्यात जास्त हवेची गुणवत्ता ही शिवडीमध्ये नोंदवण्यात आली. तर शिवडीच्या हवेची गुणवत्ता ही 329 AQI आहे. त्यानंतर कांदिवलीत 270 AQI, मालाडमध्ये 244 AQI, भायखळात 228 AQI, वांद्रे खेरवाडीमध्ये 224 AQI आणि बोरीवलीत 204 AQI नोंदवण्यात आलं आहे. 200 पेक्षा जास्त AQI आहे. हे सगळे आकडे आरोग्यासाठी घातक आहेत.
पीएम 2.5 आणि पीएम 10 ची पातळी वाढली
मुंबईत पीएम 2.5 आणि पीएम 10 ची धोकादायक पातळी नोंदवण्यात आली आहे. मालाड आणि शिवडीमध्ये पीएम 2.5 ची पातळी ही 500 आणि पीएम 10 ची पातळी ही 500 AQI पर्यंत पोहोचली. कांदिवली पश्चिममध्ये पीएम 2.5 ची पातळी ही 477 आणि पीएम 10 ची पातळी ही 491 AQI पर्यंत पोहोचली. बीकेसीमध्ये 387 आणि 410 AQI, चेंबूरमध्ये 429 आणि 351 AQI ची नोंद करण्यात आली आहे.