Weather Update: मुंबईमध्ये रात्रीच्या वेळेस आता गारठा जाणवू लागला आहे. मुंबईत सध्या दिवसा गरमी आणि रात्रीच्या वेळेस नागरिकांना गारवा जाणवतोय. रविवारी मुंबईचे किमान तापमान 18.9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं होतं. मुख्य म्हणजे हे या सिझनमधील नीचांकी तापमान होतं. रविवारी दिवसाचं तापमान 35.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. पुढील ५ दिवस दिवस आणि रात्रीच्या तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने चढ-उतार होत राहणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबई उपनगराचे किमान तापमान 18.9 अंश सेल्सिअस होतं. तर कमाल तापमान 35.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं. शहराचं किमान तापमान 21.8 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय. 


हवामानतज्ज्ञ राजेश कपाडिया यांच्या सांगण्यानुसार, रात्रीच्या वेळी काहीशी थंडी आणि दिवसा कमाल तापमानामुळे पुढील एक ते दोन दिवस मुंबईत उष्मा राहणार आहे. 27 डिसेंबरपर्यंत दिवसाचं तापमान 34 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.


आजच्या दिवशी कसं असणार आहे हवामान


ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे आज किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीये. पालघर जिल्ह्यातील डहाणूत किमान तापमान 18.8 अंश सेल्सिअस, तर दमणमध्ये रविवारी सकाळी 16.8 अंश सेल्सिअस इतकं होतं.


महाबळेश्वरपेक्षा छत्रपती संभाजीनगर गारठलं


राज्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी सकाळी सर्वात कमी 11.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. हे तापमान महाबळेश्वरपेक्षा जवळपास चार अंश सेल्सिअस पेक्षा जास्त थंड आहे.


'या' भागात पावसाची शक्यता


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 30 डिसेंबरपासून हवामानात बदल जाणवेल. 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान चार दिवस उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, 27 आणि 28 डिसेंबर रोजी तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकलमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल.