मुंबई : राज्यात सोमवारी अनेक नगरपालिकांचे निकाल जाहीर झालेत. पाहुयात नगरपालिका निवडणुकीच्या बातम्या...


नंदूरबार नगरपालिका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अत्यंत अटीतटीच्या नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेसची सत्ता आलीये. काँग्रेसच्या रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांची तब्बल साडेचार हजार मताधिक्याने नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. ३९ जागांपैकी काँग्रेसला २४ जागांवर तर शिवसेनेला ४ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपाला ११ जागांवर समाधान मानावे लागले आहे.


तळोदा - नवापूर


नंदुरबार जिल्ह्यातील तीन पालिकांच्या निवडणुकीत दोन ठिकाणी काँग्रेसला विजय मिळाला आहे तर तळोदा पालिकेत भाजपचे कमळ फुलले आहे. नवापूर पालिकेतही काँग्रेसने सत्ता कायम ठेवली आहे. नवापुरमध्ये नगराध्यक्षपदी हेमलता पाटील या विजयी झाल्या आहेत.  तळोदा पालिकेत भाजपने करिष्मा दाखवत सत्ता काबीज केली आहे. तळोद्यात भाजपचे अजय परदेशी नराध्यक्षपदी निवडून आले आहेत.


वाडा नगरपंचायत


वाड्यातील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर या नगराध्यक्षपदी निवड झालीये. भाजपाच्या निशा सवरा यांचा  पराभव केला आहे. निशा सावरा या आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या कन्या आहेत. शिवसेना 6, भाजपा 6 , काँग्रेस 2, बहुजन विकास आघाडी 2 तर राष्ट्रवादी 1 असे पक्षीय बलाबल आहे.


जव्हार नगर परिषद


जव्हार नगरपरिषदेच्या निवडणूकीत शिवसेनेनं बाजी मारलीय. शिवसेनेच्या नगराध्यक्षपदी चंद्रकांत पटेल विजयी झालेत. तर 17 जागांपैकी शिवसेना नऊ, राष्ट्रवादी काँग्रेस सहा तर जव्हार प्रतिष्ठान आणि भाजपा यांना दोन जागा मिळाल्या आहेत.


डहाणू नगर परिषद


पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषद भाजपने जिंकलीय. नगराध्यक्षपदी भाजपचे भरत राजपूत मोठ्या मतांनी विजयी झाले आहे. तर नगरसेवकांच्या 25 जागांपैकी  भाजपचे 15 उमेदवार विजयी झालेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 आणि शिवसेनेचे 2 उमेदवार निवडून आलेत.