पैसे थकल्याने ऐन उन्हाळ्यात नांदेड शहराजवळील पावडेवाडी भागाचा पाणीपुरवठा नांदेड महापालिकेने बंद केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहराचा भाग बनलेल्या या भागात तब्बल 55 हजार लोकसंख्या वास्तव्यास आहे. हा भाग पावडेवाडी ग्रामपंचायती मध्ये येतो. मागील 28 दिवसांपासून या भागाचा पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 दिवसांपूर्वी विष्णुपुरी येथील पंपिंग स्टेशनची मुख्य पाइपलाइन फुटून बिघाड झाला होता.  त्यामुळे नांदेड शहरालाही आठ दिवस पाणीपुरवठा झाला नव्हता. दुरुस्ती झाल्यानंतर नांदेड शहराचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. पण पावडेवाडीचा पाणीपुरवठा महापालिकेने सुरूच केला नाही. पंपगृहातील बिघाडानंतर नांदेडचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अडचण येत असल्याने पावडेवाडीला पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्षात पावडेवाडी ग्रामपंचायतीकडे 4 कोटी 69 लाख रुपये थकीत असल्याने पाणीपुरवठा अद्यापही बंदच असल्याचं समोर आलं आहे. 


जोपर्यंत थकीत पैसे देण्याबाबत ग्रामपंचायत लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे. ते म्हणाले आहेत की, "2 कोटी 84 लाखांचं व्याज असून 1 कोटी 72 लाख हे मुद्दल आहे. त्याचं काय नियोजन केलं जाईल याची लेखी माहिती देण्यास सांगण्यात आलं आहे. यानंतर लगेच महापालिका पाणी पुरवठा सुरु करणार आहे. पैशांमुळे पाणी रोखण्यात आलेलं नाही. त्यांचं लेखी म्हणणं दिल्यानंतर लगेच पाणीपुरवाठा सुरु केला जाईल. आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी तात्काळ पाणी पुरवठा सुरु कऱण्याचे आदेश दिले आहेत". दरम्यान ग्रामपंचायतीने पैसे न भरल्याने मात्र एन उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे