सांगली : निलंबित पोलीस उपनिरिक्षक युवराज कामटेनं पोलीस कोठडीत संशयित आरोपीचा खून केल्याप्रकरणी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. युवराज कामटेने सुपारी घेऊन अनिकेतचा खून केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका बॅग विक्रेत्याने, अनिकेत विरोधात खोटा चोरीचा गुन्हा दाखल करून, अनिकेतला अडकवले. तो दुकानदार सध्या गायब आहे. त्या दुकानदारांची सुपारी घेऊन कामटेने खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 


अनिकेत विरोधात याआधी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही, आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील संशयिता विरोधात पोलीस थर्ड डिग्री वापरून, त्याला बेदम मारहाण कसे करू शकतात ? असा संतप्त सवाल सर्वजण उपस्थित करत आहेत.


पी एस आय युवराज कामटेला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सह आरोपी करा अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली आहे.


दरम्यान, आज पहाटे अनिकेतचा मृतदेह शवविच्छदनासाठी आणण्यात आला. त्यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केलीय. 


प्रक्रियेला विलंब झाल्यास पोलिस स्टेशन बाहेरच अंत्यसंस्कार करण्याचा इशारा देण्यात आलाय. पोलीसांचाही मोठा फौजफाटा रुग्णालयाबाहेर जमा झाला आहे.